वाळूज महानगर : मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण व जलसमाधी घेतलेल्या संजय ताकतोडे यांच्या कुटुंबियांना ५० लाखांची आर्थिक मदत देण्यात यावी, या मागणीसाठी मातंग समाजातर्फे पंढरपुरातील तिरंगा चौकात शुक्रवारी रास्ता रोको करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी महामार्ग अडवून शासनाच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
राज्य घटनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १३ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. मात्र, या आरक्षणाचा मातंग समाजाला योग्य प्रमाणात लाभ मिळत नाही. त्यामुळे सामाजिक, आर्थिक, राजकीय व शैक्षणिकदृष्ट्या मागास राहिला आहे. सदर आरक्षणातून मातंग समाजासाठी स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे, यासाठी समाजातर्फे अनेक वर्षांपासून लढा दिला जात आहे. परंतू या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे. सरकार गांभीर्याने लक्ष देत नसल्याने संजय ताकतोडे या तरुणाने जलसमाधी घेवून आपली जीवन यात्रा संपविली. या घटनेच्या निषेधार्थ तसेच वरील मागण्यांसाठी मातंग समाजातर्फे पंढरपूर तिरंगा चौकात शुक्रवारी साडेअकरा वाजता रास्ता रोको आंदोलन करुन प्रशासनाचे लक्ष वेधले.
यावेळी आंदोलनकांनी औरंगाबाद-नगर महामार्गावर १० मिनिटे ठिय्या दिला. तसेच सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल गायकवाड यांना मागण्याचे निवेदन देवून आंदोलन मागे घेतले. आंदोलनात संजय मिसाळ, अर्जुन गालफाडे, नाना कांबळे, मारुती गायकवाड, विलास सौदागर, सुशिल रणनवरे, प्रकाश शेजवळ, ज्ञानेश्वर नाडे, सुनिल जोगदंड, विकास आव्हाड, सूर्यकांत नवगिरे, सोपान कांबळे, सिंधुबाई रणनवरे, मुक्ता खरे, नंदा आव्हाड, प्रमिला नाडे, साधना साबळे, मीना घुले, अरुणा भालेराव, कांता वाघमारे आदींची उपस्थिती होती. दरम्यान आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळित झाली होती. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.