विजय मुंडे , उस्मानाबादराज्य शासनाच्या वतीने जिल्हा रुग्णालयात एड्स नियंत्रण सोसायटी अंतर्गत एड्स नियंत्रण व प्रतिबंधक विभाग सुरू केला आहे़ या विभागांतर्गत दोन एआरटी सेंटर, ५ लिंक एआरटी सेंटर, १३ आयसीटीसी सेंटर, दोन ब्लड बँक, एसटीआय विभागाच्या कामकाजावर नियंत्रण ठेवले जाते़ आयसीटीसी सेंटर अंतर्गत ‘एचआयव्ही’ची तपासणी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना लागणाऱ्या साहित्याचा पुरवठा मागील दोन वर्षापासून बंद करण्यात आला आहे़ रुग्णालय स्तरावरून उपलब्ध होणाऱ्या साहित्यावरच उद्दीष्ठ पूर्ण करण्याचे काम कर्मचारी करीत असले तरी हे साहित्य उपलब्ध करताना कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे़उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात सन २००९ पासून जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक कार्यालय सुरू करण्यात आले आहे़ या अंतर्गत १३ आयसीटीसी सेंटर, दोन रक्तपेढ्या, दोन एआरटी सेंटर, पाच लिंक एआरटी व एक एसटीआय केंद्रावर नियंत्रण ठेवले जाते़ जिल्ह्यातील आयसीटीसी केंद्रामध्ये आलेल्या रुग्णांची एचआयव्ही तपासणी व एचआयव्ही बाबत समुपदेशन करण्याचे काम या विभागातील अधिकारी, कर्मचारी करतात़ एचआयव्ही तपासणीसाठी महत्त्वाच्या असलेल्या किटस् शासनाकडून पुरविण्यात आल्या आहेत़ मात्र, व्हॅक्यूअम ट्यूब विथ निडल्स, सिरिंज, मायक्रोटिप्स, हॅन्डग्लोज, डिस्पोजीबल पिप्लेटस आदी साहित्याचा पुरवठा बंद आहे़ विशेष म्हणजे हे साहित्य जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयातून वेळोवेळी उपलब्ध करून घ्यावे, अशा सूचना देण्यात येतात़ एकीकडे वर्षाकाठी अर्ध्यालाखाहून अधिक एचआयव्ही तपासणी करण्याचे उद्दीष्ठ दिले जात असले तरी दुसरीकडे ही तपासणी करण्यासाठी लागणारे साहित्यच पुरवठा केले जात नाही़ त्यामुळे ऐनवेळी साहित्य उपलब्ध करून घेताना कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते़ शिवाय ग्रामीण भागात साहित्य उपलब्ध नसेल तर तालुका, जिल्हास्तरावर धावपळ करावी लागत आहे़ एकीकडे एचआयव्ही रुग्ण तपासणीचे साहित्य वेळेत उपलब्ध होत नाही तर दुसरीकडे विविध विभागातील संगणक, प्रिंटर्स किट ठेवण्यासाठी असलेले टीओआरही नादुरूस्त असतात़ याचा परिणामही कामकाजावर होताना दिसत आहे़ या विभागासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानावर वीज, इंटरनेट, दूरध्वनी बिले भरण्याची कामे केली जात आहेत़ तर सन २०१६-१७ साठीचे अनुदान अद्यापही देण्यात आलेले नाही़ निधीअभावी कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे़
‘एचआयव्ही’ तपासणी साहित्याचा पुरवठा बंद !
By admin | Published: August 26, 2016 12:32 AM