अंतरवाली सराटी: केंद्राला हात जोडून विनंती आहे, गोरगरीब समाजाचे हाल करू नका.केंद्र आणि राज्य सरकारने कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेऊन ओबीसीतून आरक्षण द्यावे. आम्ही दहा दिवसांपेक्षा जास्त वाट पाहू शकणार नाहीत. ५००० पुरावे मिळाल्याने आता आरक्षण समितीचे काम बंद करा, असे आवाहन मनोज जरांगे यांनी सरकारला केले. तसेच सरकारकडे आणखी दहा दिवस आहेत, येथे आलेल्या लाखोंच्या जनसागराचे एकचे मागणे आहे, मराठ्यांना आरक्षण द्या. या दहा दिवसात आरक्षण पाहिजेच, जर तुम्ही नाही दिले तर चाळीसाव्या दिवशी सांगू पुढे काय करायचे, त्यानंतर सरकार जबाबदार राहील, असा इशाराही जरांगे यांनी सरकारला दिला.
अंतरवाली सराटी येथील सभेला लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता.जरांगे पुढे म्हणाले, गोरगरीब मराठ्यांनी मोठे केलेले राजकारणी आम्हाला विचारतो सभेसाठी पैसे कोठून आला. १२३ गावांतील फक्त २३ गावांतून २१ लाख जमा झाले.लोकांनी पैसे दिले आहेत. एवढ्या मोठ्या नेत्याला काय बोलावे ते कळायला हवे. अजित पवार यांनी त्यांना समज द्यावी, असे आवाहन छगन भुजबळ यांचे नाव न घेता जरांगे यांनी केले. तसेच गुणरत्न सदावर्ते यांना देखील समज देण्याचे आवाहन देवेंद्र फडणवीस यांना केले. मराठे दिलेला शब्द मोडत नाही. सभेसाठी आलेला समाज शांततेत आला आणि शांततेच जाणार. पोलिस प्रशासनाने आपल्याला सहकार्य केले आपण त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जरांगे यांनी केले.
काय म्हणाले मनोज जरांगे: - मराठ्यांना कुणबी म्हणून ओबीसीमधूनच आरक्षण द्या - कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशी द्या - दर दहा वर्षांनी ओबीसीचा सर्वे करा, प्रगत जातींना ओबीसीमधून बाहेर काढा - वेगळा प्रवर्ग करून आरक्षण दिले तरी चालेल, पण 50 टक्क्यातच आरक्षण द्यावे, वेगळा प्रवर्ग टिकला पाहिजे