येडशी : सोलापूर-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग रूंदीकरणादरम्यान उस्मानाबाद तालुक्यातील गडदेवदरी व पावकाई देवी मंदिर रस्त्यावर भुयारी मार्ग करावा यासाठी ग्रामस्थांनी हे काम बंद पाडले. सध्या सोलापूर-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर येडशी येथे बाह्यरस्त्याचे काम चालू आहे. येथून जवळच पावकाई देवी मंदिर आहे. येथे दररोज भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते, तसेच या रस्त्यावरून गडदेवदरी देवस्थानाकडे रस्ता जातो. येथे महाराष्ट्र व बाहेर राज्यातून भाविक मोठ्या संख्येने येतात. येथून सोनेगाव, भानसगाव, कुमाळवाडी, अंबेजवळगा, कौडगाव, कारी, जहागीरदारवाडी, जहागीरदारवाडी तांडा, उस्मानाबाद रेल्वे स्टेशन, येडशीमधील लमाण तांडा व साई मंदिर अशा भागात जाण्यासाठी या रस्त्याचा वापर होतो. येथे भुयारी मार्ग न झाल्यास अपघाताचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. ६ जानेवारी रोजी डॉ. प्रशांत पवार यांच्या नेतृत्वाखाली काही नागरिकांनी सोलापूरच्या नॅशनल हायवे कार्यालयात भेट घेऊन भुयारी याबाबत निवेदन दिले होते. यावेळी वरिष्ठांनी अभियंता तोडकरी यांना ग्रामस्थांशी चर्चा व माहिती घेण्यासाठी घटनास्थळावर पाठविले. परंतु, तोडकरी यांनी तांत्रिकदृष्ट्या येथे भुयारी मार्ग करता येत नाही, असा अभिप्राय दिला. तेव्हाच ग्रामस्थांनी काम करू देणार नाही, असा इशारा दिला होता. सोमवारी हे काम सुरू झाल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी ते बंद करून मशिनरी परत पाठवल्या. यावेळी डॉ. प्रशांत पवार, शिवसेना शाखाप्रमुख सुनील शेळके, अमर पवार, श्रीराम पवार, सुधाकर पवार, सूर्यकांत घाडगे, रामकृष्ण तापडे, बालाजी पवार शैलेश चंदनशिवे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
भुयारी मार्गासाठी रुंदीकरण थांबविले
By admin | Published: January 31, 2017 12:01 AM