घाटी : औषध प्रशासनाने घेतले २ नमुने, तपासणीसाठी मुंबईला पाठविले
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना लिपोसोमल ॲम्फोटेरेसीन बी हे इंजेक्शन दिल्यावर उलट्या, थंडी व दम लागण्याच्या त्रासाला सामोरे जावे लागले. त्या इंजेक्शनचा वापर थांबवण्यात आला असून, रुग्णांवर उपचार सुरू असणाऱ्या वाॅर्डात वितरित केलेली इंजेक्शन्स औषध भंडारात परत मागविण्यात आली आहेत. त्याचे पर्यायी औषध असल्याने सध्या उपचारात अडचण नसल्याचे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले.
औषध प्रशासनाचे निरीक्षक जीवन जाधव यांनी घाटीच्या औषध भंडाराला भेट देत लिपोसोमल ॲम्फोटेरेसीन बी या इंजेक्शनच्या उपलब्ध दोन कंपन्यांच्या साठ्यातून दोन सॅम्पल विश्लेषणासाठी घेतले. ते मुंबई येथे प्रयोगशाळेत प्राधान्याने अहवाल मिळावा यासाठी पाठवले असून पुढील १४ दिवसात ती इंजेक्शन वापरायोग्य आहेत की नाही, याचा खुलासा होईल. तोपर्यंत त्या बॅचच्या इंजेक्शनचा वापर थांबवण्याचे सांगण्यात आले आहे. औषध भंडारात २६०० व्हायल उपलब्ध होत्या, तर वाॅर्डातून इंजेक्शन परत आल्यावर आणखी संख्या वाढेल, असेही जाधव यांनी सांगितले.