नांदेड : जिल्हा प्रशासनाच्या करमणुक कर विभागाने महाराष्ट्र करमणुक शुल्क अधिनियिमाचा दाखल देत केबल धारकांनी ग्राहकांकडून जोडणीच्या माध्यमातून मासिक आकारच्या प्रमाणात तीन महिन्यात आकारण्यात येणारी रक्कम किंवा पाच लाख रुपये यापैकी जी रक्कम जास्त असेल ती ठेव म्हणून ठेवण्याचा आदेश दिला आहे़ त्यामुळे ऐन सणासुदीत केबलधारकांवर मात्र विघ्न आले आहेत़नांदेड शहरातील आजघडीला जवळपास ११० केबल चालक आहेत़ त्यांच्याकडून दर महिन्याला करमणुक कर विभागाकडे जोडणीनिहाय कर भरण्यात येतो़ यामध्ये काही केबल चालकांकडून हेराफेरी करुन शासनाचा महसूलही बुडविण्यात येतो़ परंतु केबलच्या व्यवसायात ग्राहकांकडून १०० टक्के वसूली होत नसल्यामुळे केबल चालकांकडून कर भरण्यासाठी ह्यतोडगाह्ण काढण्यात येतो़ परंतु आता ३० सप्टेंबरपर्यंत जिल्हा डिजिटलायझेशनचा निर्णय घेण्यात आला आहे़ त्याबाबत मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, करमणुक कर विभागाचे मकरंद दिवाकर यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली़ या बैठकीला केबल चालकही उपस्थित होते़ स्वामी यांनी केबल चालकांना नियमांची माहिती दिली़ परंतु त्याचबरोबर महाराष्ट्र करमणुक शुल्क अधिनियम १९२३ मधील कलम ५ नुसार, करमणुक शुल्क न भरल्यास दंडाच्या रकमेत वाढ करुन ती दोन हजार रुपये ऐवजी थेट पंचवीस हजार रुपये करण्यात आली आहे़ त्याचबरोबर केबल चालकाकडे असलेल्या जोडण्यांची तीन महिन्याची रक्कम किंवा पाच लाख रुपये यापैकी जास्त असलेली रक्कम केबलचालकांनी प्रशासनाकडे ठेव म्हणून ठेवावी असे आदेश दिले आहेत़ या निर्णयामुळे केबल चालकांचे धाबे दणाणले आहेत़ जे छोटे केबल चालक आहेत़ त्यांनी एवढी मोठी रक्कम भरता येत नसल्याचे बैठकीत सांगताच, प्रशासनाकडून त्यांना व्यवसाय सोडण्याचा सोपा सल्ला देण्यात आला़ दरम्यान, या निर्णयामुळे केबल चालकांवर उपासमारीची वेळ येणार असून राज्यात कुठेही नसताना फक्त नांदेड जिल्ह्यातच अशाप्रकारे केबल चालकांकडून जास्तीचा कर का वसूल करण्यात येणार असा सवालही केबल चालकांनी उपस्थित केला़ (प्रतिनिधी)
केबल चालकांवर विघ्न
By admin | Published: August 27, 2014 12:22 AM