छत्रपती संभाजीनगर - मागील चार दिवसांपासून मराठवाड्यात जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी झाल्याने ११ लाख ६७ हजार २७० हेक्टरवरील उभ्या पिकांचे नुकसान झाले. सर्वाधिक ९० टक्के नुकसान कोरडवाहू जमिनीवरील पिकांचे झाले आहे.
मराठवाड्यात जून ते ऑगस्टदरम्यान केवळ रिमझिम पाऊस होत होता. मुसळधार पावसाअभावी लहान, मोठी धरणे कोरडी होती. यामुळे प्रत्येक जण मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत होता. मागील महिन्यापर्यंत पडलेला रिमझिम पाऊस पिकांसाठी उपयुक्त होता. मराठवाड्यात सर्वाधिक क्षेत्र सोयाबीनचे आहे. त्यापाठोपाठ कापूस आणि मका पीक घेतले जाते. सोयाबीनला आता शेंगा, तर कापसाला कैऱ्या (बोंडे) लागलेली आहेत. मक्यानेही तुरे टाकल्याने शेतकरी खुश होता. महिनाभरात साेयाबीन, मका पिकाची काढणी सुरू होणार आहे. मात्र, मागील चार दिवसांपासून मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे.
११ सर्कलमध्ये अतिवृष्टी : मागील २४ तासांत मराठवाड्यातील ११ सर्कलमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद. ११,३१,३२१ हेक्टर जिरायती क्षेत्रावरील पिकांचे नुकसान १६,२२५ हेक्टर बागायती जमिनीवरील पिकांची नासाडी १९,७२४ हेक्टरवरील फळबागांची हानी झाली आहे.