- रुचिका पालोदकर
औरंगाबाद : आज समाजाने उंबरठ्याबाहेर अनेक गोष्टी फेकून दिल्या आहेत. माझ्या लघुपटातून किंवा लेखनातून वर्तुळाबाहेरच्या या कथा नव्हे, तर व्यथा मांडून व्यवस्थेशी भांडण्याचा प्रयत्न करतो आहे. मी लहानपणी जे पाहिले ते फक्त ‘१५ आॅगस्ट’ या लघुपटातून मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे, अशा भावना प्रा. अनिलकुमार साळवे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.
प्रा. साळवेलिखित तथा दिग्दर्शित ‘१५ आॅगस्ट’ या लघुपटाला लंडन येथे झालेल्या न्यूलीन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून गौरविण्यात आले. यानिमित्त ही विशेष मुलाखत.
प्रश्न- चित्रपट जगताची कोणतीही पार्श्वभूमी नसताना या क्षेत्राकडे कसे वळलात?- बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील एका अत्यंत गरीब कुटुंबात मी जन्माला आलो. बालवयात, तरुणपणात अनेक भोग वाट्याला आले. अनेक व्यथा, दु:ख मी जवळून पाहिले. दु:ख अनावर झाल्यावर माणूस रडतो तसे मी फक्त माझा हा आक्रोश कागदावर लेखन स्वरूपात उतरवत गेलो आणि एके क कथा तयार होत गेली. नकला करायचा छंद लहानपणापासूनच होता. त्यानंतर एका भावाच्या मदतीने एकांकिकेत काम करायला लागलो आणि या दिशेने पाऊल पडले.
प्रश्न- ‘१५ आॅगस्ट’ लघुपटाची कथा नेमकी सुचली कशी?- माझ्या गावात सोजर नावाची वेश्या राहायची. लहानपणी रोजच ती दिसायची. आमच्याशी ती बोलायची, हसायची. त्या वयात काही कळायचे नाही; पण मोठे होत गेलो, तसे तिचे हाल कळायला लागले. तिचा मृत्यूही मोठ्या दुर्दैवी पद्धतीने झाला. हे सगळे मनात साठलेले होतेच त्यामुळे माझ्या गावातील हे खरे कथानक घेतले. त्याला माझ्या दु:खांचीही जोड दिली आणि ‘१५ आॅगस्ट’ची कथा तयार झाली.
प्रश्न- या चित्रपटाच्या दिग्दर्शनाविषयी सांगा.- दिग्दर्शनाचे कोणतेही तांत्रिक शिक्षण मी घेतलेले नाही. त्यामुळे मला जे आणि जसे दिसते तसेच प्रेक्षकांपुढे ठेवायचे, असा प्रयत्न केला. डोळ्यांएवढा सुंदर कॅमेरा दुसरा कोणताही नाही, असे मी मानतो. कोणते दु:ख कोणत्या अँगलने पाहायचे, हे मला वास्तव जीवनात सोसलेल्या कष्टांमुळे फार चांगले उमजते. त्यामुळे दिग्दर्शन म्हणून विशेष काहीही न करता फक्त जे पाहिले आहे, त्याला न्याय देण्याचा करीत गेलो.
प्रश्न- या चित्रपटातील कलावंतांची निवड कशी केली?- चित्रपटातील भूमिकेला शोभतील, अशा व्यक्तींना चेहरा मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटातील सर्व कलाकार हे कामगार कुटुंबातील आहेत.
‘गरिबी मजबुरी नाही, मजबुती’मी भोगलेली गरिबी आज माझी मजबुरी नाही तर मजबुती झाली आहे. प्रबोधनाच्या चळवळी विषाच्या बाटलीत बंद झाल्या आहेत. पुस्तकातही आज जे विषय वाचायला मिळत नाहीत, असे वर्तुळाबाहेर फेकलेले विषय यापुढे मांडत राहण्याचा मानस आहे. माझ्या कामातून कोणताही उपदेश न करता जसे दिसते तसे मांडायचा प्रयत्न आहे.