औरंगाबाद : आम्ही लग्न करून आलो आहोत, मी पतीसोबत जात आहे, असे सांगणाऱ्या तरुणीचे नातेवाइकांनी दोघांमधील वयाचे आंतर आणि इतर समुपदेशन करताच आमचे लग्न अधिकृत झाले नाही. मला माझ्या आई-वडिलांकडे जायचे असल्याचा जबाब नोंदविला. कथित वधूचा जबाब ऐकून त्यानेही माघार घेतल्याने न झालेल्या लग्नावर पडदा पडला.
निराला बाजार येथे कॅफेचालक ४२ वर्षीय व्यक्तीने (नवरदेव) त्याच्यापेक्षा २० वर्षांनी लहान असलेल्या तरुणीसोबत प्रेमसंबंध निर्माण केले. तो अविवाहित असल्यामुळे त्याने तिला लग्नाची मागणी घातली. तिचे एमजीएम संस्थेत शिक्षण चालू आहे. त्याने तिचा विश्वास संपादन करण्यासाठी ती राहात असलेल्या वसाहतीत घर भाड्याने घेतले. २३ मे रोजी सकाळी तो तिला घेऊन एका विवाह संस्थेत गेला. मात्र, वधु-वरांच्या वयामध्ये २० वर्षांचे अंतर पाहून संस्थाचालकाने त्यांचे लग्न लावायला नकार दिला. यामुळे त्याने तिला कारमध्येच मंगळसूत्र घातले. जोडवे आणि चैन गाडीतच घालायला लावली. कपाळावर कुंकू लावून तो तिला घेऊन सकाळी पुंडलिकनगर ठाण्यात गेला. आम्ही लग्न केले आहे. आमच्या घरातील नातेवाइकांचा आमच्या लग्नाला विरोध असल्यामुळे त्यांच्याकडून त्रास होण्याची शक्यता त्यांनी वर्तविली. पोलिसांनी त्यांना अर्ज लिहून आणायला सांगितले.
यामुळे तरुणी त्या व्यक्तीसोबत ठाण्यातून बाहेर पडली. त्यांच्या मागावर असलेल्या तिच्या नातेवाइकांनी त्यांना गाठले असता तो तिला घेऊन ठाण्यात माघारी आला. तेथे तिचे नातेवाईक आले. यावेळी तिच्या नातेवाइकांनी तिचे समुपदेशन केले. तो तुझ्यापेक्षा वयाने २० वर्षांनी मोठा आहे. वयातील अंतरामुळे भविष्यात तुमच्यात निर्माण होणारे प्रश्न सोडविता येणारे नसतील, असे पटवून दिले. तेव्हा तिने आमचे अधिकृत लग्न झाले नसल्याचे सांगितले. त्या व्यक्तीने कारमध्येच मंगळसूत्र घातल्याचे तिने सांगितले. त्याच्या सांगण्यावरून आम्ही लग्न करून आलो, असे पोलिसांना सांगितल्याचे ती म्हणाली. यानंतर तिने पोलिसांना दिलेल्या सविस्तर जबाबात त्यांचे अधिकृत लग्न झाले नाही. ती स्वायत्त असल्यामुळे ती आई-वडिलांसोबत तिच्या घरी जात असल्याचे नमूद केले. पोलिसांनी या सर्व घटना घडामोडीची ठाणे डायरीला नोंद केली.