औरंगाबाद : भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी राजीनामा दिला. या रिक्त पदासाठी ३१ डिसेंबर रोजी निवडणूक होणार असून, गुरुवारी १४ जणांनी २९ उमेदवारी अर्ज घेतले. शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, एमआयएम आणि अपक्ष नगरसेवकांचा समावेश आहे.
भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी उपमहापौर निवडणुकीत उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले होते. भाजपसोबत गजानन बारवाल यांची अपक्ष आघाडी आहे. गजानन बारवाल यांना गुरुवारी ४ उमेदवारी अर्जांचे वितरण करण्यात आले. शिवसेनेचे बन्सी जाधव यांनीही ४ अर्ज घेतले. काँग्रेसचे अफसर खान (२ अर्ज), रेशमा अशफाक कुरेशी (२), भाऊसाहेब जगताप (२), खान अय्युब म. हुसेन खान (१), शबनम बेगम कलीम कुरेशी (१), राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंकिता विधाते (२), परवीन खैसर खान (२), मुल्ला सलिमा बेगम खाजोद्दीन (२) यांनीही अर्ज घेतले. याबरोबरच एमआयएमचे गंगाधर ढगे (२), अब्दुल रहीम शेख नाईकवाडी (२) यांच्यासह अपक्ष जोहराबी नासेर खान (२), रमेश जायभाय (१) यांनीही गुरुवारी उमेदवारी अर्ज घेतले.
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे बुधवारपर्यंत काही ठरलेले नव्हते. शिवसेना स्वत: निवडणूक लढणार का? याकडे लक्ष लागले होते. अखेर गुरुवारी या तिन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी उपमहापौरपदासाठी अर्ज घेतले. अर्ज वितरणानंतर आता शुक्रवारी (दि.२७) अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. या दिवशी किती जण अर्ज दाखल करतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोणत्या पक्षाचा होणार उपमहापौर?राज्यात बदलेल्या परिस्थितीमुळे उपमहापौरपदासाठी काँग्रेस आग्रही असल्याचे दिसते. महापालिकेत शिवसेनेचे सर्वाधिक सदस्य आहेत. त्यामुळे उपमहापौरपद शिवसेनेकडे राहील, यासाठी प्रयत्न केले जात असल्याचेही दिसते. या सगळ्यात नेमके कोणत्या पक्षाचा उपमहापौर होणार, हे ३१ डिसेंबर रोजीच स्पष्ट होईल.