वाळूज महानगर : सिडकोवाळूज महानगरातील पथदिव्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. काही दिवसांपासून पथदिवे बंद असल्याने बहुतांशी मुख्य रस्ते अंधारात आहेत. सणासुदीच्या काळातही अंधारामुळे गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
सिडको वाळूज महानगर १ व २ या नागरी वसाहतीमधील मुख्य रस्त्यावरील काही अपवाद वगळता उर्वरित पथदिवे काही दिवसांपासू बंद आहेत. तर काही रस्त्यावर केवळ खांब उभे आहेत. अंधारामुळे चोरी, लूटमारीच्या घटना घडत असल्याने नागरिकांनी रस्त्यावरील पथदिवे सुरु करण्याची ओरड सुरु केली होती.
त्यामुळे चार महिन्यापूर्वी प्रशासनाने लाखो रुपये खर्च करुन रस्त्यावर एलईडी लाईट बसविले. परंतू महिना दीड महिन्यातच यातील अर्ध्यापेक्षा अधिक लाईट बंद पडल्या. तर काही लाईट सतत चालू-बंद होत आहेत. आज घडीला सिडको जलकुंभ परिसरासह शिवाजी चौक, महावितरण रस्ता, सूर्यवंशीनगर, पाईपलाई ते सिडको कार्यालय, वडगाव-तीसगाव रस्ता, ग्रोथ सेंटर, एस क्लब परिसर, तापडिया इस्टेट आदी मुख्य रस्ते अंधारात आहेत. अंधारातून ये-जा करावी लागत असल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
सध्या गणेशोत्सव सुरु असल्याने नागरिकांची उशिरापर्यंत वर्दळ असते. परंतू रस्त्यावर अंधार असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.