जायकवाडी : ढाकेफळसह परिसरातील गावात महावितरणकडून सक्तीने वीज बिल वसुली मोहीम राबविली जात आहे. बिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली आहेत. याविरोधात अ. भा. छावाचे जिल्हाध्यक्ष किशोर शिरवत यांनी पुढाकार घेत सक्तीने वीज पुरवठा खंडित करू नका, अशी मागणी लोहगावचे शाखा अभियंता यांच्याकडे निवेदनातून केली आहे. नसता शेतकऱ्यांना सोबत घेऊन कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला.
निवेदनात म्हटले आहे की, ढाकेफळसह परिसरातील गावात महावितरणकडून वीज बिल थकीत शेतकऱ्याच्या कृषी पंपाचा वीज पुरवठा सक्तीने खंडित करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली. त्यामुळे शेतातील उभी पिके संकटात सापडली आहेत. शेतकऱ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आधीच अतिवृष्टी, कोरोना महामारी यांसारख्या विविध संकटात शेतकरी भरडून निघाला आहे. त्यात महावितरणने वीज पुरवठा खंडित केल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात उभे असलेले गहू, हरभरा, ऊस आदी पिके पाण्याअभावी जळून जात आहेत. हे पीक शेतकऱ्यांच्या हातातून जात आहे. मुबलक पाणी असतानाही केवळ विजेअभावी हाताशी आलेली पिके हिरावली जात असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून सक्तीने सुरू असलेली थकबाकी वसुली थांबवावी, अशी मागणी शाखा अभियंत्यांना करण्यात आली. यावेळी योगेश शिसोदे, अमोल आव्हाड यांची उपस्थिती होती.
फोटो :