औरंगाबाद : २४ तास ७ दिवस कामावर तैनात असलेली पोलीस अधिकारी, कर्मचारी आपले छंद जोपासत तणाव दूर करत असल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. असाच एक व्हिडीओ ज्यात औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निमित्त गोयल 'काचा बदाम' वर नृत्य करत असल्याचा व्हायरल झाला आहे. पोलीस अधिक्षक गोयल हे तणाव दूर करण्यासाठी नृत्याच्या छंदाची जोपासना करतात, हे अनेकांना प्रेरणा देत आहे.
कायदा व सुव्यस्था, सभा, समारंभ, राजकीय दौरे ते कोरोना काळ अशा वेळी सर्व सुरळीत करण्याची जबाबदारी पोलीस विभागावर असते. या शिवाय गुन्हेगारी, वाहतूक नियंत्रण, कम्युनिटी पोलिसिंग असेही कामे पोलीस करत असतात. मात्र, २४ तास ऑन ड्युटी असल्याने पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तणावात असतात. कायम स्ट्रेसफुल वातावणामुळे अनेक शारीरिक, मानसिक अडचणी उद्भवतात. यावर मात कारणासाठी अनेकजण विविध छंद जोपासतात. यात गायन, वादन, नृत्य, चित्रकला, वाचन इत्यादीचा समावेश आहे. औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निमित्त गोयल यांनी देखील असाच मार्ग निवडत नृत्याचा छंद जोपासला आहे.
पोलीस अधीक्षक गोयल यांनी 'काचा बदाम' या व्हायरल रीलवर भन्नाट डान्स केल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर कौतुकाचा विषय ठरत आहे. नृत्याचा त्यांचा हा व्हिडीओ अल्पावधीतच व्हायरल झाला आहे. 'स्ट्रेसफुल ते जॉयफुल' होण्यासाठी अनेकांनी त्यांच्या या छंदाचे अनुकरण करणार असल्याच्या कमेंट केल्या आहेत.