छत्रपती संभाजीनगर: रामगिरी महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे छत्रपती संभाजीनगर इथं काल काहीसं तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. रामगिरी महाराज यांच्या वक्तव्याचे पडसाद शुक्रवारी गुलमंडी, सिटी चौकात उमटले. जवळपास अडीच हजारांचा जमाव एकत्र आल्यानंतर काही काळ तणाव निर्माण झाला होता. सायंकाळी ५ वाजता पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांनी नागरिकांना महत्त्वाचं आवाहन केलं असून आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केल्यास कडक कारवाईचा इशारा दिला आहे.
"छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम, फेसबुक इ. सोशल मीडियाद्वारे आक्षेपार्ह स्टेटस, रील्स, स्टोरी प्रसारित करू नये. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, ट्विटरवर कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ पाठवू नये. असे करणाऱ्या व्यक्तींवर कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. कुठल्याही समाज विघातक कृत्यात सहभागी होऊ नका, अफवांवर विश्वास ठेवू नये, नागरिकांनी शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे," असं आवाहन पोलीस आयुक्तांकडून करण्यात आलं आहे.
शहरात नेमकं काय घडलं?
सराला बेटाचे महंत मठाधिपती रामगिरी महाराजांनी सिन्नरच्या पांचाळे गावात प्रवचनादरम्यान एका धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने सिन्नर, वैजापुरात तणाव निर्माण झाला. तेथे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. शहरातील मुख्य बाजारपेठ पैठण गेटवर शुक्रवारी याचे पडसाद उमटले. एका गटाने दुपारी १२ वाजता बाजारपेठेत फिरून दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. त्यानंतर त्यांनी क्रांती चौक पोलिस ठाण्यात संबंधित महाराजांवर गुन्हा दाखल करून अटकेची मागणी केली.
ठाण्यांना सतर्क राहण्याच्या सूचनातणावाच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलिस ठाण्यांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. शहरातील संवेदनशील ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.