---
रिॲलिटी चेक : मास्क हनुवटीवर, कार्यालये, रुग्णालय परिसरात रंगताहेत गप्पांचे फड
औरंगाबाद : जिल्ह्यात ११ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत अंशत: लाॅकडाऊन करण्यात आले आहे. दरम्यान, शनिवार आणि रविवार पूर्ण दिवस लाॅकडाऊन जाहीर केले असून, कोरोनाबाबत कठोर निर्बंध घातले आहेत. मात्र, नागरिकांकडून हलगर्जीपणा केला जात आहे. पोलीस किंवा मनपाची पथके दिसल्यावर अथवा कोणी हटकले, तरच हनुवटीवरचा मास्क वर चढवला जातो. नागरिकांकडून निर्बंधाचे गांभीर्याने पालन केले जात नसल्याचे रिॲलिटी चेकमधून दिसून आले.
अलिकडे कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, तर औरंगपुरा, गुलमंडीसह मध्यवर्ती शहरात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांच्या हनुवटीवर मास्क लावल्याचे चित्र सर्रासपणे दिसून येत आहे. पैठणगेट परिसरात अनेक दुकानदारही मास्क न लावता ग्राहकांशी संवाद साधताना दिसून येत आहेत. गर्दीवर निर्बंध असताना मुख्य बाजारपेठांतील गर्दी अद्याप ओसरलेली नाही. बुधवारपासून हाॅटेल, रेस्टाॅरंटमधील डायनिंग सुविधा बंद करण्यात आली आहे. मोठी हाॅटेल्स, रेस्टाॅरंटमध्ये केवळ पार्सल सुविधा सुरु राहील, असे स्थानिक प्रशासनाने जाहीर केले आहे. मात्र, निराला बाजार परिसरात अनेक अल्पोपाहार हॉटेल्स सुरु असल्याचे बुधवारी दुपारच्या वेळी दिसून आले.
---
संयुक्त पाहणी, दंडात्मक कारवाईची ताकीद
---
कोरोनाच्या जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी, मनपा प्रशासक, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस आयुक्त यांनी संयुक्त पाहणी केली. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल, व्यापारी व दुकानदारांवर दोन ते पाच हजार दंडाची कारवाई करुन नियम न पाळल्यास परवाना रद्द करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. शहरातील विविध भागांत जनजागृतीसाठी सात पथके तैनात करण्यात आली असून, विनामास्क रिक्षाचालक व नागरिकांना मोफत मास्क वाटप करण्यात येत आहे. तसेच नागरी मित्र आणि पोिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे.
----
कोठे काय आढळले
---
चित्रपटगृहे
--
औरंगपुऱ्यातील चित्रपटगृहाचे सकाळच्या सत्राचे चार शो प्रेक्षकांअभावी रद्द करण्यात आल्याचे तेथील व्यवस्थापकांनी सांगितले, तर दुपारी पाच वाजेदरम्यान शेवटचा शो असतो. दुपारी २० हून अधिक प्रेक्षक आले होते. चित्रपटगृहात कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन केले जात होते. मात्र, आता उपस्थितीच पाच टक्केही नसल्याचे व्यवस्थापकांचे म्हणणे आहे.
---
विवाह समारंभ
---
५ एप्रिलपर्यंत असलेल्या निर्बंधांत विवाह सोहळ्यांना परवानगी देण्यात आलेली नाही, तर इतर कार्यक्रमही होत नसल्याने सभागृह, मंगल कार्यालये बंदच असल्याचे दिसून आले. अशंत: लाॅकडाऊनच्या काळातील काही बुकिंग होते. त्याऐवजी संयोजकांकडून पुढच्या तारखांचे नियोजन होत असल्याचे पदमपुरा येथील मंगल कार्यालय व्यवस्थापकांनी सांगितले.
---
अंत्यविधी
---
बुधवारी दुपारी नॅशनल काॅलनी येथील बाधित वृद्धेवर पु्प्षनगरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अंत्यविधी करणाऱ्या पथकासह अवघे पाच ते सात नातेवाईक स्मशानभूमीत उपस्थित होते. नातेवाईकांना विनंती केली, तर ते एकतात. अंत्यविधीच्या वेळी गर्दी करत नाहीत. मास्क, सॅनिटायझरचा वापर केला जातो, असे गोविंग गायकवाड म्हणाले.
---
कार्यालये
---
जिल्हा परिषद, घाटी रुग्णालय, जिल्हा सहकारी उपनिबंधक कार्यालयात कर्मचारी मास्क, सॅनिटाझरचा वापर करुन काम करताना दिसले. मात्र, अभ्यागत, रुग्णांच्या नातेवाईकांकडून मास्क वापराला फाटा दिला जात आहे. अनेकांचे मास्क हनुवटीवर असतात. सुरक्षारक्षक, कर्मचारी त्यांना ओरडून मास्क वर करायला घाटीत सांगत होते. त्यालाही अनेकजण जुमानत नव्हते.
---
गृह विलगीकरण
--
रुग्णालयात जागाच नसल्याने अनेकांना गृहविलगीकरणाचा पर्याय दिला जात आहे. त्यात कुटुंबियांकडूनही काळजी घेतली जात आहे. मात्र, स्नेहनगर, खडकेश्वर, श्रेयनगर परिसरात विलगीकरण झालेल्या घरांंच्या दारावर कुठलाही बोर्ड दिसून आला नाही. मनपाकडून निर्जंतुकीकरण केल्याचे नातेवाईक म्हणाले.
--