औरंगाबाद : गणेश विर्सजनात गडबड, गोंधळ आणि कोविडच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी पोलीस विभागाने कडक सुरक्षा तैनात केली आहे. पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता हे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून असणार आहेत. तसेच आयुक्त, उपायुक्त आणि सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांसोबत टास्क फोर्स असणार आहे. हा टास्क फोर्स सकाळी ६ वाजेपासूनच कार्यरत राहणार आहे.
शहरातील विविध विभागांमध्ये आयुक्तांसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात आठ टास्क फोर्सच्या पथकाचे नियंत्रण असणार आहे. या फोर्समध्ये ४ पोलीस अधिकारी, ४१ पोलीस कर्मचारी असणार आहेत. सर्वाधिक बंदोबस्त जिल्हा परिषदेच्या मैदानाजवळील विसर्जन विहीर परिसरात असणार आहे. तेथे सहायक पोलीस आयुक्तांसह दोन पोलीस निरीक्षक नियंत्रण करणार आहेत. याशिवाय महापालिकेने गणेश विसर्जनाची निश्चित केलेली स्थळ आणि गणेश मुर्ती संकलनासाठी ९ झोनमध्ये ठरवून दिलेल्या ठिकाणी गणेश मूर्ती संकलन समन्वयक म्हणून एक उपनिरीक्षक, ९ पोलीस अंमलदार नेमण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
चौकट,
असा असणार फाैजफाटा
गणेश विसर्जनासाठी रविवारी सकाळी ६ ते सायंकाळी रात्री उशिरापर्यंत आयुक्त, तीन उपायुक्त, चार सहायक आयुक्त, २८ पोलीस निरीक्षक, ८३ सहायक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक, ११०७ पोलीस कर्मचारी आणि १७१ महिला पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत. याशिवाय रेल्वे पोलीस निरीक्षक ३, रॅपिड ॲक्शन फोर्सची एक कंपनी आणि राज्य राखीव पोलीस दलाचीही एक कंपनी गणेश विसर्जनासाठी शहरात दाखल झाली आहे.