खुलताबाद : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील घटनेच्या निषेधार्थ सोमवारी खुलताबाद शहरासह तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. खुलताबाद शहर, कागजीपुरा येथील मुस्लिम बांधवांनी बंदमध्ये सहभाग घेत आपापली दुकाने बंद करून निषेध मोर्चात सहभागी झाले.
खुलताबाद शहर व तालुक्यात सकाळपासून व्यापा-यांनी आपापली दुकाने बंद ठेवली. शहरात सकल मराठा समाज, व्यापारी वर्ग व मुस्लीम बांधवाच्यावतीने लाठीचार्ज हल्ल्याच्या निषेधार्थ तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. दरम्यान, तालुक्यातील विरमगाव येथे मराठा बांधवावर झालेल्या लाठीचार्ज तसेच मराठा आरक्षणास सरकार दिरंगाई करत असल्याच्या निषेधार्थ गावातून राज्य सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात येवून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांच्या गर्दीवर परिणामजालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील घटनेनंतर रविवार व सोमवारी दोन दिवसापासून श्री घृष्णेश्वराच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांचा परिणाम झाल्याचे दिसून आला. त्यातच दोन दिवसापासून स्मार्ट सिटी बस, एसटी बस बंद असल्याने भाविकांची मोठी गैरसोय झाली आहे. राज्यातील व परराज्यातील भाविकांची अत्यल्प गर्दी दिसत आहे. त्याच बरोबर जगप्रसिद्ध वेरूळ लेणी बघण्यासाठी येणा-या पर्यटकांची संख्या दोन दिवसापासून रोडावली आहे.