औरंगाबाद : कृषी कायद्याच्या निषेधार्थ जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीत अडत व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला. थोडा भाजीपाला आला; पण दिवसभरात धान्याचे एकही पोते आले नाही.
बाजार समितीबाहेर शेतीमाल विक्री करण्यास मुभा देण्यात आली आहे, तसेच बाजार समितीबाहेर खरेदी-विक्रीला कोणतेही बाजार शुल्क लागणार नाही, या भेदभाव करणाऱ्या कृषी कायद्यांमुळे संतापलेल्या अडत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला. येथील अडत बाजारात परराज्यातून आलेला २ ट्रक बटाटा उतरवून घेण्यात आला. काही शेतकऱ्यांनी किरकोळ भाजीपाला आणला होता. तो किरकोळ विक्रेत्यांनी विकला, पण अडत्यांनी आपले व्यवहार संपूर्णपणे बंद ठेवले होते. जेथे प्रचंड गर्दीमुळे पायी चालणे कठीण होत होते तेथे मंगळवारी सकाळी भाजीपाल्याचे अडत व्यापारी व कर्मचारी दुकानासमोर क्रिकेट खेळत होते.
धान्याच्या अडत व्यापारी संघटनेने शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदला पाठिंबा दिला होता. यामुळे दुकाने तर सोडाच; पण सेल हॉलचे गेटही आज उघडण्यात आले नाही. शेतकऱ्यांनीही दिवसभरात धान्याचे एक पोतेही विक्रीला आणले नाही. दिवसभर सर्वत्र शुकशुकाट होता.
चौकट
हमाल-मापाड्यांची निदर्शने
शेतकऱ्यांना विश्वासात न घेता केलेले ३ कृषी कायदे रद्द करा, माथाडी कायद्याची सार्वत्रिक अंमलबजावणी करा, अशा घोषणा देत महाराष्ट्र लेबर युनियन व मराठवाडा लेबर युनियनतर्फे सकाळी १० वाजता बाजार समितीसमोर निदर्शने करण्यात आली. महामंडळाचे सरचिटणीस सुभाष लोमटे यांनी कृउबाचे सहायक सचिव के. आर. चव्हाण यांना मागणीचे निवेदन दिले.