जिल्ह्यात गर्दीचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणार्या करमाड, शेंद्रा एमआयडीसी चौकात सकाळी दुकाने उघडण्यापूर्वीच करमाड पोलिसांनी बंद ठेवण्याचे आवाहन केल्यानंतर दुकाने दिवसभर बंदच दिसून आली. फक्त मेडिकल्स, दवाखाने, दूध डेअरी ही दुकाने तेवढी उघडी होती. सर्व बँकाही बंद राहिल्याने दोन दिवस येथील परिसरात शुकशुकाटच जाणवला.
करमाड येथील बाजारपेठ तर शुक्रवारी ग्रामपंचायतीने व्यापाऱ्यांना केलेल्या आवाहनानंतर शनिवारी, रविवारी बंदच राहणार हे निश्चित झाले होते. त्यानुसार येथे दोन दिवस बाजारपेठेतील सर्वच दुकाने बंद होती. गोलटगाव येथील शनिवारचा, तर रविवारी पिंप्रीराजा येथील आठवडा बाजार भरलाच नाही. तत्पूर्वी, बोटावर मोजण्याइतकेच व्यापारी बाजारस्थळी आल्याचे दिसून आले. ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाकडून बाजार भरवता येणार नसल्याचे सांगण्यात आल्यानंतर, हे व्यापारीही लागलीच आल्या पावली परतले. बाजारात खरेदीसाठी स्थानिक नागरिकांसह परिसरातील आलेल्या मंडळींनाही खरेदीविना परतावे लागले. पिंप्रीराजा, लाडसावंगी, शेकटा, कुंभेफळ येथील मुख्य चौकात व पारावर असलेली गर्दीही आज दिसून आली नाही.