छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्यातील १७ लाख कर्मचाऱ्यांनी १४ डिसेंबरपासून बेमुदत संपाचा इशारा दिला असून, संप अटळ असल्याचा दावा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष देविदास जरारे यांनी केला. संपाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शासकीय मुद्रणालय येथे कर्मचाऱ्यांनी संपाचे पोस्टर हाती घेत पेन्शन मागणीसाठी घोषणाबाजी केली. संप काळात रोज सकाळी ११:०० वा. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.
राज्यातील १७ लाख कर्मचाऱ्यांनी मार्च २०२३मध्ये सात दिवस जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी संप पुकारला होता. सरकारने संघटनांना आश्वासनही दिले होते. परंतु, सरकारने कर्मचाऱ्यांचा विश्वासघात केला असून, १४ डिसेंबर २०२३पासून सर्व कर्मचारी संपावर जाणार आहेत. यात मराठवाड्यातील सुमारे ४० हजार सरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश असेल, असा दावा करण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांनी मार्च २०२३मध्ये आठवडाभर संप केला. मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी संघटनेला जुन्या पेन्शनबाबत सचिव पातळीवर मार्ग काढू, असे आश्वासन दिले होते. त्यावेळी संघटनेने जुनी पेन्शन पूर्वलक्षी प्रभावाने द्यावी, असे शासनाकडेला लेखी मागितले होते.
संघटनेच्या १९ सदस्य, ३० सचिवांसह राजकीय नेत्यांची त्यावेळी उपस्थिती होती. जुन्या पेन्शनप्रमाणे आर्थिक, सामाजिक सुरक्षेची हमी देण्याचे शासनाने मान्य केले होते. परंतु, त्यावर काहीही निर्णय न झाल्यामुळे संप करण्यात येणार आहे. प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकावर भाऊसाहेब पठाण, एन. एस. कांबळे, संजय महाळंकर, अनिल सूर्यवंशी, सुरेश करपे, लता ढाकणे, परेश खोसरे, वैजीनाथ बिघोतेकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.