शासनाच्या मोफत धान्याची गरीबांना प्रतिक्षा.....
पैठण : लॉकडाऊन कालावधीत गोरगरिबांना आर्थिक साहाय्य उपलब्ध व्हावे म्हणून राज्य शासनाने पात्र लाभार्थ्यांना मे महिन्यात दोन व जून महिन्यात एक वेळेस मोफत अन्नधान्य वाटप करण्याचे आदेश सार्वजनिक वितरण व्यवस्थेला दिले आहेत. यासाठी पर्याप्त अन्नधान्याचा पुरवठा तहसीलकडे केला आहे. तर दुसरीकडे स्वस्त धान्य दुकानदारांनी आपत्ती काळातच संप पुकारल्याने गरिबांच्या घरात मात्र अद्यापही धान्याचा दाणा पोहोचला नसल्याने मोठा संताप व्यक्त होत आहे.
अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी प्रति शिधापत्रिका ३५ किलो अन्नधान्य व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांस प्रतिव्यक्ती ५ किलो अन्नधान्य मोफत देण्याबाबत राज्य शासनाने निर्देश दिले आहेत. याचप्रमाणे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना २ महिन्यांकरिता (मे व जून २०२१ साठी) मोफत अन्नधान्य वाटप करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सदर निर्णयानुसार पात्र लाभार्थ्यांना प्रतिमहा मे व जून २०२१ साठी त्यांना देय असलेले अन्नधान्याव्यतिरिक्त अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यास प्रतिव्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ असे एकूण ५ किलो अन्नधान्य मोफत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र स्वस्त धान्य दुकानदारांच्या संपाने धान्यवाटपात विघ्न आले आहे. पैठण तालुक्यात २१७ स्वस्त धान्य दुकाने आहेत. ५५१९१ कुटुंब शिधापत्रिका असून एकूण लाभार्थ्यांची संख्या २७०५४६ इतकी आहे. यात अंत्योदय योजनेत २८२०२ तर प्राधान्य कुटुंब योजनेत २१८८१५ लाभार्थी आहेत. यासाठी ८५५०.२४ क्विंटल गहू व ५४३३.६१ क्विंटल तांदूळ पुरवठा कार्यालयास उपलब्ध झाला आहे. तालुक्यातील ग्रामसेवक, कृषीसेवक व तलाठी यांची दुकानांवर मोफत अन्नधान्य वितरित करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली असल्याचे नायब तहसीलदार दत्तात्रय निलावाड यांनी सांगितले.
कोट
तालुक्यातील ९० स्वस्त धान्य दुकानावर अन्नधान्य पोहोचविण्यात आले आहे. दुकानदारांचा संप मिटताच लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य वाटप करण्यात येईल.
- चंद्रकांत शेळके, तहसीलदार, पैठण