औरंगाबाद : कृत्रिम पावसासाठी प्रयत्न केले जात असले तरी त्यातून खूप काही हाती लागत नसल्याचे चित्र सध्या तरी आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत सहा दिवसांत प्रयोगासाठी विमानाने उड्डाण करीत रसायनांची फवारणी केली. आजवर ६३ गावांवरील पाणीदार ढगांत रसायनांच्या ८९ नळकांड्या जाळण्यात आल्या.
पावसासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू असून, अजून दखलणीय पाऊस प्रयोगातून झालेला नाही. २० आॅगस्ट रोजी घनसावंगी तालुक्यात ढगांवर फवारणी करण्यात आली होती. त्यानुसार येथे पाऊस झाल्याचा दावा प्रशासनाने केला. २१ आॅगस्ट रोजी अंबड तालुक्यातील रुई, बाबा दर्गा घनसावंगी, पराडा (ता. अंबड), तनवाडी (ता. घनसावंगी), गुरुप्रिंप्री (घनसावंगी), पीरगाऊबवाडी (घनसावंगी), ममदाबाद (जालना), करला (जालना), खोदेपुरी (जालना), भिलपुरी (जालना), खोरदगाव (पाथर्डी, अहमदनगर), मोहरी (पाथर्डी, अहमदनगर), पाथर्डी, वासू (पाथर्डी), अमरापूर (शेगाव, अहमदनगर), अशा १९ ठिकाणी ३८ नळकांड्यांतून फवारणी करण्यात आली. या १९ ठिकाणांपैकी काही ठिकाणी दोन वेळा फवारणी करण्यात आली आहे. विमानाने सायंकाळी ३ वाजून ५६ मिनिटांनी उड्डाण घेतले आणि हे विमान ५ वाजून ५० मिनिटांनी औरंगाबाद विमानतळावर उतरले. २२ आॅगस्ट रोजी मांडू तांडा, गोंदी, पिंपरखेड (ता. अंबड), मांडला (जालना), माखणी (गंगाखेड, जि. परभणी), पुष्पनगर, बारभाई तांडा, केसापुरी, शाजानपूर, (माजलगाव, जि. बीड), मैनदा (बीड), किनगाव व भाटेपुरी (गेवराई) आणि बीड शहरात विमानाच्या माध्यमातून ढगात रसायनांची फवारणी करण्यात आली.
२३ आॅगस्ट रोजी ५ वाजून ५ मिनिटांनी सी-९० या विमानाने कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी उड्डाण घेतले. ६.३० वा. विमान विमानतळावर उतरले. दोन नळकांड्या ढगांत जाळण्यात आल्या. परभणी जिल्ह्यातील सेलू, पर्डी या परिसरात प्रयोगासाठी प्रयत्न झाले. रडारच्या माध्यमातून पाणीदार ढगांची माहिती मिळाल्यानंतर वैमानिकाने उड्डाण घेत फवारणी केली.
रविवारी केला अहमदनगर, बीड जिल्ह्यांत प्रयोग २५ आॅगस्ट रोजी रविवारी ३ वाजून ५ मिनिटांनी सी-९० हे विमान प्रयोगासाठी उडाले. ६ वाजून २ मिनिटांनी ते विमानतळावर उतरले. आज ३४ (नळकांड्या) फ्लेअर्स ढगात सोडण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यातील खासपुरी, पाथर्डी, शिरळ, तीसगाव, गोलेगाव, शेवगाव, घायतकवाडी, बीड जिल्ह्यातील पिंपळनेर, रायमोह, शिरूर, मालकाची वाडी, शिरापूर, उम्रद जहागीर, बीड शहर, अंबेवडगाव, धारूर, बावी, वडवणी, काठोडा येथे प्रयोग केला. २४ रोजी ३ वाजून २६ मिनिटांनी सी-९० विमान प्रयोगासाठी आकाशात झेपावले. ५.४२ वा. ते विमान खाली उतरले. १५ हायड्रोस्कोपिक फ्लेअर्स जाळण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यातील भानाशिवार, नेवासा, शिंंगोरी, शेवगाव, पेमगिरी, संगमनेर, बीड जिल्ह्यातील नाळवंडी, पाटोदा, आंबेवाडी, आष्टी, हतकरवाडी येथे प्रयोग केला. रविवारी त्या भागत पाऊस झाल्याच्या नोंदी आहेत.