औरंगाबाद : कोरोना चक्रव्यूहामध्ये मागील वर्षभरात सर्वसामान्य नागरिक आणि व्यापारी अक्षरश: भरडले गेले आहेत. पुन्हा आठ दिवसांचा लॉकडाऊन कोणालाही परवडणारा नाही. हातावर पोट असलेल्या नागरिकांचे मरण होईल. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनचा पुन्हा एकदा फेरविचार करावा या मागणीसाठी मुस्लीम संघटनांचे एक शिष्टमंडळ जिल्हाधिकारी यांची भेट घेणार आहे.
माजी नगरसेवक इलियास किरमानी यांच्या निवासस्थानी रविवारी दुपारी विविध संघटनांची एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत लॉकडाऊनसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. मागील वर्षभरात व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले गेले. हातावर पोट असलेल्या नागरिकांची शहरात संख्या खूप मोठी आहे. आठ दिवस त्यांची उपजीविका कशी होईल यावर चर्चा करण्यात आली. कोरोनासंदर्भातही बैठकीत विविध मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले. दोन वेगवेगळे मतप्रवाह या ठिकाणी पहायला मिळाले. पहिला लॉकडाऊन होऊ द्या, दुसरा लॉकडाऊन लावला तर त्याला विरोध करू असेही काही जणांनी नमूद केले. बराच वेळ चर्चा झाल्यानंतर एक समिती निश्चित करण्यात आली. समितीमधील सदस्यांनी बैठकीतून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना दूरध्वनीवर संपर्क साधला. सर्व प्रतिनिधींच्या भावना त्यांच्या कानावर घालण्यात आल्या. दहा जणांचे एक शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन लॉकडाऊनचा फेरविचार करावा, अशी मागणी करणार आहे. या बैठकीस इलियास किरमानी, कदीर मौलाना, सलीम सिद्दिकी, वाजेद इंजिनियर, इक्बाल अन्सारी, रशीद मौलाना, प्रा. मशू , मोईद हशर, मसियोद्दिन सिद्दिकी आदींची उपस्थिती होती.