औरंगाबाद : एसटी महामंडळाचा सोमवारी ७२ वर्धापन दिन आहे. अनेक चढ-उतार पहात 'एसटी'ने वाटचाल केली आहे. कोरोनाच्या संकटालाही 'एसटी' सामोरे जात आहे.
कोरोनामुळेच यंदा वर्धापन दिन साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी महामंडळाची एक जून १९४८ रोजी अहमदनगर-पुणे मार्गावर पहिली बस धावली होती. यानिमित्त दरवर्षी १ जून हा दिवस एसटी महामंडळातर्फे वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र, यंदा महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट उभे आहे. त्यामुळे वर्धापन दिन साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिली. राज्यात १ जून १९४८ रोजी पुणे ते अहमदनगर मार्गावर लाकडी बॉडी आणि आजुबाजुला कापडी कव्हर लावलेली पहिली बस धावली होती. एसटी महामंडळाची सुरुवात १९४८ मध्ये झालेली असली तरी मराठवाडा हा निजामाच्या जोखडात असल्याने तेव्हा औरंगाबादसह मराठवाड्यात निजाम स्टेट रेल्वे रोड ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट या नावाने प्रवासी वाहतूक चालविण्यात येत होती.
१९६० मध्ये मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रात समाविष्ट झाला आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची सेवा सुरू झाली. त्यावेळी मराठवाड्यात ५ जिल्हे होते. जिल्ह्याचे विभागीय कार्यालय औरंगाबादेत होते. त्यावेळी औरंगाबादेत रेल्वेस्टेशन आणि शहागंज येथे बसस्थानक होते. या दिवशी सुरू झाले मध्यवर्ती, सिडको बसस्थानक ११ जून १९६४ रोजी औरंगाबादचे विभागीय कार्यालय सुरु झाले. ३ नोव्हेंबर १९७८ रोजी मध्यवर्ती तर २१ मार्च १९८६ रोजी सिडको बसस्थानक सुरू झाले. तेव्हापासून तर २०२० या कालावधीत 'एसटी' ने सेवेत विविध बदल केले आहेत.