औरंगाबाद : शेंद्रा पंचतारांकित वसाहतीमधील ऑरिक सिटीतील ऑरिक हॉलच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ७ सप्टेंबर रोजी औरंगाबादेत येत आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने सुमारे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबतच केंद्र आणि राज्य गुप्तवार्ता विभागाचे अधिकारी, तसेच अन्य अधिकारी चार दिवसांपासून औरंगाबादेत मुक्काम ठोकून आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव बंदोबस्ताची माहिती मात्र पोलीस यंत्रणेने देण्यास नकार दिला.ऑरिक हॉलचे उद्घाटन आणि महिला बचत गट कार्यकर्तींचा मेळावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ७ सप्टेंबर रोजी होत आहे. पंतप्रधानांचा दौरा निश्चित झाल्यापासून ऑरिक सिटी परिसर पोलिसांनी ताब्यात घेतला. विशेष पोलीस महानिरीक्षक रविंदर सिंगल, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अप्पर अधीक्षक गणेश गावडे, पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, उपायुक्त मीना मकवाना, उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या सुरक्षेचे नियोजन करीत आहेत. चिकलठाणा विमानतळ ते ऑरिक सिटीदरम्यान पंतप्रधान हेलिकॉप्टरने जाणार असल्याची प्राथमिक माहिती आहे, असे असले तरी पोलिसांकडून सतत सराव केला जात आहे.
शहरातील सर्व हॉटेल आणि लॉजची तपासणीपंतप्रधानांचा दौऱ्याच्या अनुषंगाने शहर पोलिसांचे गुन्हे शाखा, विशेष शाखा, सायबर पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी हे शहरातील सर्व हॉटेल आणि लॉजची तपासणी करीत आहेत. आठ दिवसांपासून ही तपासणी सुरू आहे. ओळखपत्राशिवाय कोणालाही हॉटेल आणि लॉजमध्ये मुक्कामी ठेवू नका, असे सक्त निर्देश पोलिसांनी हॉटेलचालक-मालकांना दिले. शिवाय नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचा इशाराही दिला.
बॉम्बशोधक आणि नाशक पथकाकडून ऑरिकची तपासणीपंतप्रधानांचा दौरा जाहीर झाल्यानंतर बॉम्बशोधक आणि नाशक पथकाकडून आठ दिवसांपासून सतत ऑरिक सिटीतील कार्यक्रमस्थळाची तपासणी केली जात आहे. वरिष्ठ अधिकारी दोन दिवसांपासून आॅरिक सिटीमध्ये मुक्काम ठोकून आहेत.
वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांसह ३ हजार पोलीस तैनातचिकलठाणा विमानतळ ते शेंद्रा एमआयडीसीतील कार्यक्रमस्थळापर्यंत पोलिसांचा खडा पहारा असेल. शिवाय शेजारील जिल्ह्यांतील २१ उपअधीक्षक, ६५ पोलीस निरीक्षक, २०५ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक आणि सुमारे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सुरक्षेचा आढावापंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त केंद्रीय गुप्तचर यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी, विशेष सुरक्षा बलाचे अधिकारी, राज्य गुप्तवार्ता विभागाचे सहआयुक्त अमितेश कुमार हे चार दिवसापांसून शहरात मुक्कामी आहेत. अप्पर पोलीस महासंचालक राजेंद्र सिंह हे आढावा घेत आहेत.