औरंगाबाद : राज्यभर पावसाच्या दमदार हजेरीमुळे नद्या दुथडी भरून वाहत असताना मराठवाडा मात्र पावसाच्या प्रतीक्षेत आहे. विभागात १२६ मिलीमीटर पावसाची तूट जुलै संपला तरी कायम आहे. विभागातील ८७२ प्रकल्पांत एक टक्क्याच्या आसपास पाणीसाठा सध्या आहे.
पाऊस लांबल्यामुळे खरिपाच्या ८४ टक्केच पेरण्या झालेल्या आहेत. १६ टक्के पेरण्या पावसाअभावी झाल्या नाहीत. विभागाची पावसाची सरासरी ७७९ मि. मी. इतकी आहे. आजवर २१७ मि. मी. पाऊस झाला. ३४३ मि. मी. पाऊस विभागात आजवर होणे अपेक्षित होते. टक्केवारीच्या तुलनेत ५० टक्के पाऊस होणे अपेक्षित होते. तर सरासरीच्या तुलनेत १२६ मि. मी. पावसाची तूट आहे. परिणामी मराठवाड्यातील खरीप धोक्यात आहे. अगामी काळात दमदार पाऊस झाला नाहीतर जलप्रकल्पांचीही परिस्थिती नाजूक होण्याची शक्यता आहे. आजपासून आॅगस्ट महिना लागला आहे. बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत चारा छावण्या सुरूच आहेत. तर २ हजारांच्या आसपास टँकर सुरू आहेत. विभागात ११ मोठ्या प्रकल्पांत ०.५० टक्के पाणी आहे. ७५ मध्यम प्रकल्पांत ३ टक्के, ७४९ लघु प्रकल्पांत दीड टक्के, गोदावरी बंधाऱ्यात ०.१५ टक्के पाणी आहे.
बुधवार सकाळपर्यंत १६.१६ मि. मी. पाऊसबुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत विभागात १६.१६ मि. मी. पावसाची नोंद झाली. यामध्ये विभागातील बीड वगळता सर्व जिल्ह्यांत बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. औरंगाबादमध्ये १५.५ मि. मी., जालना १७.१० मि.मी., परभणी ११.०५ मि.मी., हिंगोली २९.४९ मि.मी., नांदेड २६.३० मि.मी., बीड ७.६० मि.मी., लातूर १०.२७ मि.मी. तर उस्मानाबादमध्ये ११.४७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.