लाडसावंगी : परिसरात शनिवारपासून दररोज रात्री वादळी पावसाने हजेरी लावल्याने रब्बी पिकासह आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यंदा आंब्याला जानेवारी व मार्च असा दोन वेळा बहर फुटला होता. याला निसर्गाचा चमत्कार समजला जात होता. मात्र, अवकाळी पाऊस, वादळी वारे यामुळे आंब्याच्या झाडांना लगडलेल्या कैऱ्यांसह हा डबल बारही गळून गेला आहे. यामुळे निसर्गाने दिले आणि निसर्गानेच हिरावले, असे मत शेतकरी व्यक्त करीत आहेत.
२० मार्चपासून दररोज सायंकाळी सात वाजता वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावत असल्यामुळे इतर पिकांसह आंबा पिकाचा बहर व कैऱ्या दोन्ही गळून गेल्या आहेत. एकीकडे अनेक आंब्यांना पहिल्यांदा डबल फुटलेला बहर, यामुळे लाडसावंगी परिसरातील शेतकरी आनंदात होते. यंदा गावरान आंब्याची गोडी दोनदा चाखायला मिळेल, असे शेतकऱ्यांना वाटले होते. परंतु लहरी निसर्गाने एका हाताने दिले अन् दोन्ही हातांनी हिरावून नेले, असे म्हणायची वेळ आली आहे.
फोटो कॅप्शन :
लाडसावंगी परिसरात शनिवारपासून पडणाऱ्या वादळी पावसाने आंब्याच्या कैऱ्या अशा झाडाखाली पडल्या होत्या.