औरंगाबाद : ऐतिहासिक पाणचक्कीसमोरील महेमूद दरवाजा मोडकळीस आला आहे. दरवाजातून वाहतूक सुरू ठेवल्यास दुर्घटना होऊ शकते, म्हणून मागील एक आठवड्यापासून वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. बारापुल्ला गेट, टाऊन हॉल भागातून नागरिकांना ये-जा करावी लागत आहे. स्मार्ट सिटी प्रशासनाने मोडकळीस आलेल्या दरवाजाचे स्ट्रक्चरल ऑडिट केले.
दरवाजाची युद्धपातळीवर डागडुजी करून रस्ता तयार करावा, पर्यायी रस्ता द्यावा, अशी या भागातील नागरिकांची मागणी आहे. दरम्यान, स्मार्ट सिटी प्रशासनाने मोडकळीस आलेल्या दरवाजाचे पुन्हा एकदा स्ट्रक्चरल ऑडिट केले. लवकरच नवीन अंदाजपत्रक तयार करून निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या सर्व प्रकियेला किती महिने लागतील हे सांगणे कठीण आहे. मात्र, स्मार्ट सिटी प्रशासनाने दहा दिवसांत निविदा प्रसिद्ध करण्याचा दावा केला आहे.