औरंगाबाद : शाहगंज येथील ऐतिहासिक क्लॉक टॉवरच्या संवर्धनाचे काम औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माध्यमातून हाती घेण्यात आले असून, बुधवारपासून प्रत्यक्षात कामास सुरुवात झाली आहे.
क्लॉक टॉवरच्या भिंतीवरील खराब प्लास्टर काढून काम सुरू झाले आहे. प्रकल्पाच्या वर्क ऑर्डरनुसार प्रकल्पाची अंदाजित किंमत २९.११ लाख रुपये असून, ४ महिन्यांत हे काम पूर्ण केले जाणार आहे. शाहगंज, चमन येथील टॉवरला ऐतिहासिक वारसा आहे. १९०१ ते १९०६ या काळात बांधण्यात आलेल्या ऐतिहासिक टॉवरवरील घड्याळ निजाम काळातील आहे. पवित्र रमजान महिन्यात सहर आणि इफ्तारसाठी क्लॉक टाॅवरमधील अलार्म वाजवला जायचा. देखभाल दुरुस्तीअभावी अनेक वर्षांपासून घड्याळ बंद होते. दरम्यान, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ऐतिहासिक टॉवर, घड्याळाची दुरुस्ती करण्याचा निर्णय मनपा प्रशासक तथा औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी घेतला. ठेकेदाराला कामासंदर्भातील पत्र दिल्यानंतर तसेच कंत्राटदाराने बँकेची हमी दिल्यानंतर बुधवारपासून प्रत्यक्षात कामास सुरुवात झाली.
जुन्या शहराचे गतवैभव परत मिळणार जुन्या शहराची ओळख ऐतिहासिक टॉवरमुळे आहे. टॉवर, घड्याळाचे संवर्धन केल्यास जुन्या शहराचे गतवैभव परत मिळण्यास मदत होईल. ऐतिहासिक दरवाज्यांचे संरक्षण व सुशोभीकरण हाती घेतले आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत असे आणखी काही प्रकल्प हाती घेण्यात येतील.- आस्तिककुमार पाण्डेय, एएससीडीसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी