औरंगाबाद : औषधी बिलावरून झालेल्या वादातून औषधी दुकानदाराने लष्करी दलातील सैनिकाला बेदम मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना १६ जानेवारी रोजी सायंकाळी गारखेडा चौकातील हर्ष मेडिकल स्टोअर येथे घडली. याविषयी पुंडलिकनगर ठाण्यात औषधी दुकानदाराविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.
पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार दिनकर सोपान नागरे हे लष्करी दलात कार्यरत आहेत. नातेवाईकांच्या औषधोपचारासाठी ते सावजी तुपकरी रुग्णालयात गेले होते. डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधाची चिठ्ठी घेऊन रुग्णालयाजवळील औषधी दुकानात गेले. त्यावेळी दुकानदाराने त्यांना दहा गोळ्यांची एक स्ट्रीप दिली. दुकानदारांनी त्यांना आकारलेले बिल हे जास्त असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी औषधीचे बिल मागितले.
बिल मागितल्याचा दुकानदाराला राग आला आणि त्यावरू न नागरेसोबत वाद घातला. नागरे यांनी त्यांना ते सैनिक असल्याचे सांगितल्यानंतर दुकानदाराने त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. या घटनेनंतर नागरे यांनी थेट पुंडलिकनगर ठाण्यात तक्रार नोंदविली.