- राजेश भिसे
औरंगाबाद : माहिती व तंत्रज्ञानाच्या क्रांतीचा एसटी महामंडळालाही फायदा झाला असून, आॅनलाईन रिझर्व्हेशन पद्धतीतून महामंडळाने कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहेत. यातून औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानकाला वर्षभरात ४ कोटी ७० लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. माहिती व तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले तसतशा सुविधाही आॅनलाईन पद्धतीने सुरू झालेल्या आहेत. प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी महामंडळाने पुढचे पाऊल टाकत आॅनलाईन रिझर्व्हेशन सिस्टिम (ओआरएस) ही यंत्रणा कार्यान्वित केली.
महामंडळाच्या मोबाईल अॅप आणि इंटरनेट वेबसाईटमुळे राज्याच्या कोणत्याही भागातून आरक्षणाची नोंदणी करणे प्रवाशांना सुकर झाले. आॅनलाईन रिझर्व्हेशनमधून एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या काळात ४ कोटी ६९ लाख ९५ हजार १६६ रुपयांचे उत्पन्न औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानकाला मिळाले आहे, तर याच काळात ९८ हजार ७८८ प्रवाशांनी या पद्धतीने आरक्षण नोंदणी केल्याचे आकडेवारीवरून दिसते. औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानकातून पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिकसह गुलबर्गा, विजापूर, इंदूर, ब-हाणपूर, अहमदाबाद, निजामाबाद या गावांसाठी आंतरराज्य बससेवा दिली जाते. या बसच्या प्रवाशांमधून आॅनलाईन रिझर्व्हेशन नोंदणी अधिक प्रमाणात झाल्याचे दिसून येते.
शिवनेरी, शिवशाही, निमआराम या बसच्या आसन आरक्षण नोंदणीस प्रवाशांचे प्राधान्य असते. स्थानकांच्या महिन्याच्या उत्पन्नापैकी दहा टक्के वाटा आॅनालाईन आरक्षण नोंदणीतून मिळत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. मे २०१८ या महिन्यात ११ हजार ७४४ प्रवाशांनी आॅनलाईन पद्धतीने नोंदणी केली असून, यापोटी महामंडळाला ५५ लाख ७५ हजार ३५६ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
तालुकास्तरावर प्रतिसाद नाही...एसटी महामंडळाच्या आॅनलाईन रिझर्व्हेशन पद्धतीत लांब पल्ल्याच्या बसमध्ये आरक्षण करणाºयांचे प्रमाण अधिक आहे. जिथे बससेवेची वारंवारता अधिक आहे तेथे आरक्षण नोंदणीस तुलनेने कमी प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. याला पुणे शहर अपवाद ठरते. तालुकास्तरावर प्रवाशांचा आॅनलाईन आरक्षण नोंदणीस प्रतिसाद कमीच मिळत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
वातानुकूलित बससेवेमुळे प्रवासी वाढले ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद घेऊन एसटी महामंडळ काम करीत आहे. खाजगी वाहनांशी स्पर्धा करतानाच प्रवाशांसाठी अधिकाधिक अॅप, वेबसाईट या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. वातानुकूलित बससेवेमुळे प्रवासी भारमान वाढले आहे. - प्रशांत भुसारी, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, औरंगाबाद.
लांबपल्ल्याच्या सेवेस अधिक प्रतिसाद औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानकातून राज्याच्या महत्त्वाच्या शहरांसह आंतरराज्य बससेवा दिली जाते. लांबपल्ल्याच्या सेवेस अधिक प्रतिसाद मिळत आहे. एसटीचा अॅप, खाजगी अॅप व वेबसाईटचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात झाला. याची परिणती उत्पन्न वाढण्यात दिसून येते.- अमोल भुसारी, आगारप्रमुख, मध्यवर्ती बसस्थानक, औरंगाबाद.