ऑनलाईन लोकमत
हिंगोली, दि. २७ : गरीब परिस्थितीमुळे वडिलांकडे आपल्या शिक्षणासाठी पैसे नाहीत या नैराश्यातून एका दहीविच्या मुलाने स्वत:च्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. सेनगाव तालुक्यातील माझोड येथे आज सकाळी हि घटना घडली.
कृष्णा पालकनाथ जाधव (१६) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याचे नववीपर्यंतचे शिक्षण कडोळी येथेच झाले तर दहावीसाठी गोरेगाव येथे २०१६ मध्ये त्याने प्रवेश घेतला. परंतु; तो त्यावर्षी नापास झाला होता. यांनतर त्याच्या वडिलाने त्याच शाळेत त्याचा परत प्रवेश घेतला. मात्र, घरची हलाखीची परिस्थिती पाहून तो शाळेत जाण्यास टाळाटाळ करत असे. त्याच्या अशा वागण्याने त्याचे आई - वडील त्याने शाळेत जावे यासाठी तगादा लावत.
यातच कृष्णाने नवीन वह्या-पुस्तके घेण्यासाठी वडिलांकडे पैस्याही मागणी केली. वडिलांनी यासाठी पैसे नसल्याचे सांगताच त्याने त्याशिवाय शाळेत जाण्यास त्याने नकार दिला. त्याने नकार दिल्याने वडील त्याच्यावर रागावले. यानंतर तो शेतात निघून आला व तेथेच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
कृष्णाचे आई - वडील रोजमजुरी करतात. त्यांच्याकडे केवळ एक एकर कोरडवाहू शेती आहे. त्याच्या मोठ्या भावासही परिस्थितीमुळे चौथीत असतानाच शिक्षण अर्धवट सोडावे लागले होते.