छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास विभागातील पीएच.डी. संशोधक अमाेल सिताराम खरात याला मेंदूशी निगडीत 'न्यूरो ॲटोयुमून' हा अतिदुर्मीळ आजार झाला आहे. या आजारावर मात करण्यासाठी अतिशय महागड्या इंजेक्शनची गरज असून, हलाकीच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्याचे कुटुंब इंजेक्शनची खरेदी करू शकत नाही. सध्या त्याच्यावर शहरातील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विद्यार्थ्यांसाठी अविरतपणे लढणाऱ्या अमोलला मदतीची गरज आहे. त्यासाठी विद्यापीठातील विद्यार्थी शक्य तेवढे निधी संकलन करीत आहेत.
विद्यापीठातील इतिहास विभागाचा संशोधक विद्यार्थी अमोल हा मागील काही वर्षांपासून सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थी, आंबेडकरी चळवळीमध्ये सक्रीय काम करतो. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक आंदोलनात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र आणि हालगी घेऊन तो आघाडीवर असे. त्यातून त्याने असंख्य विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला. मात्र मागील महिनाभरापासून त्याची प्रकृती बिघडली आहे. त्याच्यावर नाशिकसह शहरातील विविध दवाखान्यात उपचार झाले. तपासण्या केल्या. तेव्हा त्यास 'न्यूरो ॲटोयूमून' हा दुर्मिळ आजार झाल्याचे निदान झाले. या आजारातून बरे होण्यासाठी महागडे इंजेक्शन लागणार आहेत. एका इंजेक्शनची किंमत ही ९ ते १० हजार रुपये एवढी आहे. आतापर्यंत केलेल्या उपचाराचा खर्चही काही लाखांमध्ये गेला आहे. अमोलसह त्याची चुलत बहिण श्रद्धाने मिळणाऱ्या तुटपुंज्या शिष्यवृत्तीसह मित्रमंडळी, नातेवाईकांकडून आर्थिक मदत घेत उपचार केले. मात्र, आता पैशाअभावी उपचार थांबविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनी मदतीसाठी मोहिम हाती घेतली आहे.
करोडवाहू शेती अन् घरातील कर्ता युवकअमोल हा परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील केहाळा गावातील रहिवाशी आहे. त्याचे वडील २ एकर कोरडवाहू शेती करतात. त्याला दोन लहान भाऊ असून, तोच घरातील कर्ता युवक आहे. त्याच्या आईचे लहानपणीच निधन झाले. जिंतूर येथे बीएचे शिक्षण घेतल्यानंतर त्याने विद्यापीठात एमए, एमफिल पूर्ण केले. सध्या तो इतिहासतज्ज्ञ डॉ. उमेश बगाडे यांच्या मार्गदर्शनात पीएच.डी.चे संशोधन करीत आहे.
विद्यार्थी आंदोलनात कायम आघाडीवर हैदराबाद येथील केंद्रीय विद्यापीठात प्रशासनाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलेला संशोधक रोहित वेमुला यांच्या सारखाच अमोल हा दिसतो. मुंबईतील आझाद मैदानात बार्टीच्या शिष्यवृत्तीसाठी चाललेल्या ५२ दिवसांच्या आंदोलनात तो आघाडीवर होता. त्याशिवाय विद्यार्थ्यांकडून लाच प्रकरण, प्रलंबित स्वाधार, किसान, विद्यापीठ विभाजन विरोध, अग्नीवीर योजना, महात्मा फुले- डॉ. आंबेडकर विचारधारा बचाव, सरकारी शाळा बचाव यासारख्या शेकडो आंदोलनातही अमोल अग्रभागी राहिलेला आहे.
याठिकाणी मदत करू शकताअमोलला आर्थिक मदत करायची असेल तर त्यांचा एसबीआय बँक खाते क्रमांक ६२१६१९३३३३९, आयएफएससी कोड SBIN०००३४२३ या खात्यात पैसे पाठवू शकतात. त्याशिवाय फोन पे नंबर ९०४९५२८२६४ यावरही मदत करता येईल.