- तारेख शेख
कायगाव : गंगापूर तालुक्यातील गोदावरी आणि शिवना काठावरच्या शेतवस्त्यांवर राहणाऱ्या कुटुंबातील अनेक विद्यार्थ्यांना जवळीची भिवधानोरा येथील शाळा गाठण्यासाठी आजही थर्माकॉलच्या तराफ्यावरून प्रवास करावा लागत आहे. संबंधित विभागाचे अधिकारी मात्र याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर नुसत्यास या वस्तीला भेट देऊन येरझाऱ्या करण्यात धन्यता मानत आहेत.
गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा शिवारातील काही भाग शिवना नदीच्या पलीकडे आहे. भिवधानोरा येथील काळे, चव्हाण, घोटकर, लवघळे आदी कुटुंबांसह अनेक शेतकऱ्यांच्या शेती आणि शेतवस्त्या या भागांत आहेत. या कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी भिवधानोरा या गावातील जिल्हा परिषद शाळा जवळची आहे. या शाळेत नदीपात्रातून आल्यानंतर ४ किलोमीटर अंतर पडते तर रस्त्याने आल्यानंतर १० ते १२ किलोमीटरचा फेरा मारावा लागतो. त्यामुळे या शेतवस्तीवरील मुले शिक्षणासाठी थर्माकॉलच्या तराफ्यावरून १ किलोमीटरचा प्रवास करणे पसंत करतात. त्यानंतर ३ किलोमीटर पायी चालत येऊन जि.प.ची शाळा गाठतात.
या विद्यार्थ्यांचा हा नित्याचा दिनक्रम आहे. सुरुवातीला या विद्यार्थ्यांना याबाबत भीती वाटत होती; परंतु नंतर त्याची या विद्यार्थ्यांना सवय झाली आहे, असे पालक सांगतात. जीव धोक्यात घालून शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्यांचा वृत्तांत ‘लोकमत’ने गतवर्षी १७ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केला होता. त्यानंतर तहसीलदार, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी आदी अधिकाऱ्यांनी या गावांना भेटी देऊन विद्यार्थ्यांची सोय करण्याचे आश्वासन दिले; परंतु पुढे काहीही झाले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी जीवघेणी कसरत आजही सुरूच आहे.पूल बांधकामासाठी ९० कोटी रुपयांचा खर्च
या प्रश्नावर मार्च महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेत लक्षवेधी मांडण्यात आली होती. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रश्न निकाली काढण्यासाठी याठिकाणी पूल तयार करावा लागणार आहे. यासाठी ९० कोटी रुपयांचा खर्च येणार असून हा खर्च जलसंपदा विभाग करू शकणार नाही. त्यामुळे यासंदर्भात ग्रामविकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी चर्चा करून लवकरच योग्य मार्ग काढला जाईल, असे सभागृहात सांगितले होते; मात्र पुढे काही झाले नाही.
शिक्षणाधिकारी चव्हाण झाल्या निरुत्तर
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी सोमवारी या भागाला भेट दिली. यावेळी त्यांनी भिवधानोरा येथील शाळेला जाण्यासाठी रस्ता उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी सरकारी वाहनाची व्यवस्था करण्याबाबत किंवा जागेवर वस्तीशाळा सुरू करण्याचे आश्वासन दिले. मात्र उपस्थित पालकांनी ही ऑफर धुडकावून लावली. वस्तीशाळा सुरू करून मुलांच्या प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था कराल. मात्र पुढील शिक्षणासाठी होणारी त्यांची दैना थांबेल का, असा सवाल पालकांनी चव्हाण यांना विचारला. त्यावर चव्हाण या निरुत्तर झाल्या. कायमस्वरूपी हा प्रश्न सोडविण्याची या पालकांची मागणी आहे.
फोटो कॅप्शन: गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा शिवारातील गोदावरी नदीपलीकडील विद्यार्थ्यांना असे थर्माकॉलच्या तराफ्यावरून प्रवास करून जवळची जि. प. शाळा गाठावी लागते.