औरंगाबाद : मुले-मुली शाळेतून सुखरूप घरी येईपर्यंत मिटमिट्यातील नागरिकांचा जीव टांगणीला लागतो. वर्षातून एकदा, दोनदा तरी एखाद्या विद्यार्थ्याला वाहन अपघातात जिवाला मुकावे लागते. यास कारण ठरते ती हायवे लगतची शाळा. शाळा भरताना व सुटताना कधी अपघाताची घटना घडेल याचा नेम नसल्याने गावकर्यांना सतत धास्ती असते. गावातील सुरक्षित स्थळी शाळेचे स्थलांतर करण्यात यावे, ही मागील २० वर्षांपासूनची गावकर्यांची मागणी. मात्र, शाळेऐवजी शहरातील कचरा गावाच्या डोक्यावर आणून टाकण्याचा घाट ‘मनपा’ने घातला होता. यामुळेच मिटमिटावासीयांचा संयमाचा बांध फुटला.
औरंगाबाद-नाशिक महामार्गालगत अनेक गावे वसलेली आहेत. त्यातीलच एक मिटमिटा. येथील महानगरपालिकेचे प्राथमिक व माध्यमिक विद्यालय हायवेलगतच आहे. ही शाळा मिटमिटावासीयांच्या हृदयाचे ठोके वाढविण्यास कारणीभूत ठरते आहे. या महामार्गावरून २४ तास जडवाहने वेगात असतात.इयत्ता बालवाडी ते दहावीपर्यंतचे ६२० विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. शाळेच्या समोर ५ ते १० फुटांची मोकळी जागा म्हणजे या शाळेचे मैदान होय. यावरून शाळेच्या बिकट परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो. पेव्हर ब्लॉक बसविलेल्या या जागेतच दुचाकी पार्किंग केल्या जातात व तेवढ्याच जागेत विद्यार्थी मधल्या सुटीत डब्बा खातात. हायवेवरून धावणारे जडवाहन कधी अनियंत्रित होईल व शाळेच्या ओट्यावर येईल याचा नेम नाही.
सकाळी सहावी ते दहावी व बालवाडीचे विद्यार्थी तर दुपारी पहिली ते पाचवीपर्यंतचे विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. शाळा भरताना व सुटताना विद्यार्थ्यांना गावात जाण्यासाठी हायवे ओलांडावा लागतो. शाळा सुटली की विद्यार्थ्यांना पहिले महामार्गालगत उभे केले जाते. महामार्गाच्या दोन्ही बाजूला शिक्षक-शिक्षिका उभ्या राहतात व दोन्ही बाजूंची वाहने थांबवितात. मग विद्यार्थ्यांना महामार्गाच्या दुसर्या बाजूस सोडण्यात येते. अनेकदा वाहनधारक शिक्षकांचे ऐकत नाहीत व विद्यार्थी रस्ता ओलांडत असतानाही भरधाव वाहने दामटली जातात. शाळेच्या मुख्याध्यापिका रजनी हिवाळे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना जीव मुठीत ठेवून रस्ता ओलांडावा लागतो. सर्व विद्यार्थ्यांनी रस्ता ओलांडला की शिक्षकांचा जीव भांड्यात पडतो. शाळा भरताना व सुटल्यावर प्रत्येकाच्या मनात धडकी भरते. शाळेचे स्थलांतरण करणे आवश्यक आहे.
शाळेचे स्थलांतर करावेमिटमिटालगत २५० एकर गायरान जमीन आहे. ही जमीन सफारीपार्कसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. येथील ५ एकर जागा मनपाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेसाठी उपलब्ध करून द्यावी. मनपाने त्यासाठी येत्या बजेटमध्ये आर्थिक तरतूद करावी. मागील २० वर्षांपासून आम्ही शाळा स्थलांतराची मागणी करीत आहोत; पण नेहमी दुर्लक्ष करण्यात आले. दरवर्षी शाळेसमोर अपघात होतात. काही विद्यार्थ्यांचा बळी त्यात गेला आहे. मनपा आणखी किती विद्यार्थ्यांचे बळी घेणार आहे. आता तरी मनपाचे आयुक्त, अधिकारी व नगरसेवकांनी जागे व्हावे. - लक्ष्मण बनकर, अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती, मिटमिटा