- राम शिनगारे
औरंगाबाद : शहरातील रहिवाशी असलेल्या चैतन्य सुदर्शन मुंढे या युवकाने छत्रपती महाविद्यालयात बारावीमध्ये ६८ टक्के घेतले. पुढे एमआयटी महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना उढाणटप्पू पणा करत असताना एका संगणकातील एका गोष्टीची आवड निर्माण झाली. पुढे त्यातच प्राविण्य मिळविले. यातुन पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिका गाठली. त्याठिकाणी शिक्षण घेत असतानाच व्टिटर कंपनीने दोन वेळा मेल करून आपल्या कंपनीत दाखल होण्याची विनंती केली. त्यासाठी ८० लाख रूपयांचे वार्षिक पॅकेज दिले. या तरुणांशी ‘लोकमत’ने साधलेला हा संवाद
-आपले शिक्षण काय झाले आहे?- दहावीपर्यंतचे शिक्षण महाराष्ट्र पब्लिक स्कूलमध्ये झाले. त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण छत्रपती महाविद्यालयत झाले. दहावीला ८४ टक्के पडले. मात्र बारावीत व्यवस्थीत अभ्यास केला नाही. मित्रांसोबत फिरणे, वडिल पोलीस अधिकार असल्यामुळे वेगळ्याच विश्वात वावर होता. त्यामुळे बारावीच्या परीक्षेत अवघे ६८ टक्के पडले. अभियांत्रिकीसाठी एमआयटी महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्याठिकाणीही अभ्यासात लक्ष नव्हते. याचवेळी एमआयटीतील सुरेश भवर आणि डॉ. व्ही. एन. क्षीरसागर यांनी रेड हॅट या आंतरराष्ट्रीय सर्टिफिकेशन देणाऱ्या अभ्यासक्रमात ‘लिनक्स’ ही आॅपरेटींग सिस्टिम शिकवली. त्यात खूप गोडी निर्माण झाली. हेच आपले करिअर होऊ शकते, हे जाणले. रेड हॅटनेच सुरुवातीला जॉब आॅफर केला. मात्र तो नाकारून उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिका गाठण्याचा निर्णय घेतला. त्याठिकाणी कॅप्युटर सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजीत पदव्युत्तर शिक्षण घेत असतानाच पार्ट टाईम नोकरी त्याच विद्यापीठात केली. मात्र माझा बायोडाटा आणि लिनक्स मधील ज्ञान प्रचंड झाल्यामुळे व्टिटर कंपनीची दारे उघडली.
- कौटुंबीक पार्श्वभूमी काय आहे?- माझ्या वडिलांचे मुळ गाव परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात आहे. त्यांची नोकरी पोलीस खात्यात आहे. आता ते सिल्लोड याठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) या पदावर कार्यरत आहे. आई पेशाने डॉक्टर आहे.
- व्टिटर या प्रसिद्ध कंपनीत प्रवेश कसा झाला?- सगळा प्रवास अविश्वसनीय आहे. सुरवातीच्या काळातील चैतन्य आणि बदललेला चैतन्य यात खुप फरक आहे. ‘लिनक्स’मध्ये प्राविण्य मिळविल्यामुळे रेड हॅट कंपनीने साडेसहा लाख रूपयांचे वार्षिक आॅफर केले होते. ज्यात शिकलो त्याच कंपनीत जॉब आॅफर केल्यामुळे आत्मविश्वास निर्माण झाला. त्याठिकाणी सहा महिने प्रशिक्षण घेतले. त्याठिकाणी कळाले बाहेरचे जग खूप मोठे आहे. त्यामुळे पदव्युत्तरचे शिक्षण घेण्यासाठी अमेरिका गाठली. त्याठिकाणीही ‘लिनक्स’मध्ये संशोधन, चिकित्सा यावर भर दिल्यामुळे शिक्षण घेत असलेल्या फ्लोरिडा विद्यापीठातच नोकरी मिळाली. ‘लिनक्स’च्या संबंधितच काम होते. सहा महिने प्रशासन अधिकारी म्हणून काम केले. तेव्हा व्टिटर कंपनीला ‘लिनक्स’मधील माझ्या ज्ञानाची माहिती मिळाली. याविषयी मला काहीही माहिती नाही. व्टिटरच्या उप व्यवस्थापकाने एक मेल पाठवून मुलाखतीला येण्याचे आमंत्रण दिले. हा मेल फेक असावा म्हणून दुर्लक्ष केला. त्यानंतर पुन्हा काही दिवसातच दुसरा मेला आला. त्यात अधिक विस्तृत माहिती होती. तेव्हा विश्वासच बसला नाही. त्या मेलला उत्तर दिले असता, तात्काळ त्यांनी मुलाखत घेण्याचे ठरवले. मुलाखत झाली. त्यात ८० लाखाचे वार्षिक पॅकेजसह इतर सुविधा आॅफर केल्या. त्यानुसार कॅलिफोर्नियाच्या सॅन फ्रॅन्सीस्को येथील व्टिटर कंपनीच्या मुख्य कार्यालयात ६ मे रोजी दाखल झालो.
- या सगळ्या प्रवासाविषयी काय वाटते? विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल?- मी काही खूप मोठा नाही संदेश देण्यासाठी. माझे वय आता २६ वर्षच आहे. सुरुवातीच्या काळात उनाडपणा केला. मात्र नंतरच्या काळात खूप मेहनत घेतली. त्यामुळे मागे वळून पाहताना खूप आनंद होतो. सगळ आश्चर्यकारक आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना वाटते की, आपले शिक्षण आयआयटी, आयआयएम अशा नामांकित कंपन्यात झाले तरच पॅकेज मिळते,पण असे काही नाही. अगदी एमआयटीमध्येही शिक्षण घेऊन एखाद्या विषयात आपण एक्सपर्ट बनलोत, तर कोणतीही कंपनी पाहिजे, तेवढे पॅकेज देण्यास तयार होते. त्यामुळे आपल्याकडे काय आहे? यावर सर्वांधिक लक्ष दिल्यास यश मिळते, एवढेच मला माझ्या अनुभवावरुन सांगता येईल.
न्यूनगंड बाळगू नका विद्यार्थ्यांनी कोणत्याही गोष्टीचा न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही. स्वत:मध्ये योग्य तो बदल केल्यास प्रत्येक गोष्ट शक्य आहे. अशक्य असे काहीच नाही. त्यासाठी प्रयत्न आणि मेहनतीची गरज आहे.- चैतन्य मुंढे