औरंगाबाद: महाविद्यालयात जातांना मोपेडस्वार वैभवी सुनील खिरड (वय १७) या विद्यार्थिनीला चिरडून पसार झालेल्या कार आणि टेम्पोचालकाला अटक करण्यात उस्मानपुरा पोलिसांना रविवारी रात्री अखेर यश आले. कारचालकास सिंधीबन झोपडपट्टीतून तर टेम्पोचालकास दौलताबादेतून पोलिसांनी अटक केली. दोन्ही वाहनेही पोलिसांनी जप्त केली.
कारचालक सुभाष भानुदास बोडखे (वय ३३, रा. कुंभारगल्ली, दौलताबाद) आणि टेम्पोचालक भाऊसाहेब तुकाराम साळवे (वय ४४, रा. सिंधीबन झोपडपट्टी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. पोलीस निरीक्षक हेमंत कदम म्हणाले की, चाणक्यपुरीतील रहिवासी वैभवी २४ आॅक्टोबरला सकाळी साडेआठच्या सुमारास मोपेडवरून शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात जातांना पीरबाजार रस्त्यावरील भाजीवालीबाई चौकात अज्ञात वाहनांने चिरडल्याने ठार झाली होती. तिला उडविणारी वाहने अपघातानंतर पसार झाली होती.
पोलीस त्या वाहनांचा शोध घेत होते. तेथील खाटकाच्या दुकानावरील सीसीटिव्ही कॅमेऱ्यांत अपघात कैद झाला होता. तिला पांढऱ्या रंगाच्या कारने उडविले आणि वीटाची वाहतूक करणाऱ्या टेम्पोने चिरडल्याचे स्पष्ट झाले होते. कॅमेऱ्यांच्या फुटेजमुळे दोन्ही वाहनांचे अर्धवट क्रमांक पोलिसांना मिळाले. पोलिसांनी खबऱ्याला कामाला लावले. वैभवीच्या नातेवाईकांशी बोलून अपघातामधील वाहनांबाबत काही माहिती मिळते का, हे पाहण्यास सांगितले.
औरंगाबादेत टेम्पोने दौलताबादेतून वीटा येतात. त्यावरून दौलताबाद येथील खबऱ्याला कामाला लावले. बोडखे चालवित असलेल्या टेम्पोने हा अपघात केल्याचे खबऱ्याकडून समोर आले. घटनेपासून बोडखेने त्याचा टेम्पो (एमएच-२०सीटी ७६०६) एका ठिकाणी उभा करून ठेवल्याचे समजले. पोलीस उपनिरीक्षक राहुल चव्हाण, कल्याण शेळके आणि कर्मचाऱ्यांनी रविवारी रात्री दौलताबाद गाठून बोडखेला अटक केली. त्याच्या ताब्यातून टेम्पोही जप्त करून शहरात आणला.
तपासादरम्यान वैभवीला उडविणारी कार भास्कर मुरमे (रा. सिंहगड कॉलनी, सिडको एन-६) यांच्या मालकीची असल्याचे स्पष्ट झाले. त्यांचा कारचालक साळवे अपघात झाल्यानंतर दोन दिवसापासून कामावर आला नसल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी कारमालक मुरमे यांच्याशी संपर्क साधून कार जप्त केली. या अपघाताविषयी मुरमे यांना काहीच माहिती नव्हते. त्यामुळे ते बिनधास्तपणे कार वापरत होते. सिंधीबन येथे सापळा रचून पोलिसांनी चालक साळवेला अटक केली.