लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अकरावी प्रवेशासाठी सोमवारी पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार होती; मात्र विद्यार्थ्यांना रात्री उशिरापर्यंत इंटरनेटवर गुणवत्ता यादी दिसलीच नाही. शिक्षण विभागाने तांत्रिक अडचणीचे कारण पुढे करीत ती यादी मंगळवारी जाहीर केली. ज्या विद्यार्थ्यांची नावे यादीत होती त्यापैकी अनेकांनी केंद्रीय पद्धतीने मिळालेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी गर्दी केली होती, तर हवे ते महाविद्यालय न मिळाल्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला. दहावीचा निकाल १३ जून रोजी जाहीर झाला. तत्पूर्वी, शिक्षण विभागाने औरंगाबाद महापालिका क्षेत्रात यंदा पहिल्यांदाच इयत्ता अकरावीसाठी केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार निकाल जाहीर झालेल्या आठवड्यापासूनच प्रवेशासाठी आॅनलाइन नोंदणी सुरू केली. तब्बल महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर आज मंगळवारी अकरावीच्या प्रवेशासाठी पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली. पहिल्या यादीत ज्या विद्यार्थ्यांची नावे होती त्यांची सकाळपासूनच प्रवेशाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अनेकांनी सकाळी दहा वाजेपासून महाविद्यालयांमध्ये गर्दी केली. तथापि, पहिल्या गुणवत्ता यादीत नाव तर आले; पण हवे ते महाविद्यालय न मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थी व पालक नाराज झाले. काही विद्यार्थ्यांना एक महाविद्यालय आणि मित्रांना दुसरेच महाविद्यालय मिळाले. काही मित्रांची नावे पहिल्या यादीत नव्हती. त्यामुळे अनेक विद्यार्थी संभ्रमात पडले. प्रवेश घ्यावा की दुसऱ्या यादीची प्रतीक्षा करावी, असा पेच विद्यार्थ्यांबरोबर पालकांसमोर निर्माण झाला. मंगळवारी जाहीर झालेल्या गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांना १३ जुलैपर्यंत दिलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेता येईल. त्यानंतर १४ आणि १५ जुलैपर्यंत आॅनलाइन नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी कोणाला जर महाविद्यालय किंवा विद्याशाखांचा पसंतीक्रम बदलावा वाटला तर ते बदलू शकतात. २० जुलै रोजी दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.
अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड
By admin | Published: July 12, 2017 12:41 AM