लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ठरवून दिलेल्या शुल्कांपेक्षा अधिक शुल्क शहरातील नामांकित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून उकळले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे.विविध बाबींसाठी घेतलेले शुल्कही विद्यार्थ्यांच्या विकासासाठी न वापरता संस्थाचालकांच्या घशात घालण्यात येत आहेत. याविरोधात सर्वपक्षीय विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. मुस्तजिब खान यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे.विवेकानंद महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी उपलब्ध करून देणारे स्नेहसंमेलन मागील तीन वर्षांपासून घेतले नसल्याचा प्रकार उघडकीस आला. याविषयी गुरुवारी विविध महाविद्यालयांची माहिती घेतली असता, विद्यापीठाने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा दुप्पट, तिप्पटचे शुल्क नामांकित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून उकळल्याची माहिती समोर आली आहे.विद्यापीठाने ठरविलेल्या शुल्कांपेक्षा विविध बाबींचा समावेश महाविद्यालयांनी मनमानी पद्धतीने केला आहे. तसेच विद्यार्थी विकासाच्या नावाने विविध हेडखालीही शुल्क उकळण्यात आले आहे. याच वेळी पैसे वाचविण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलनसुद्धा घेण्यात येत नाही. काही महाविद्यालयांनी वार्षिक स्नेहसंमेलने घेतली आहेत. मात्र यात अनेक नामांकित महाविद्यालयांनी स्नेहसंमेलने घेण्याकडे पाठ फिरविली आहे. अशा महाविद्यालयांवर कलम ४२० अन्वये नियमानुसार गुन्हे दाखल करण्याची मागणीही सर्वपक्षीय विद्यार्थी कृती समितीने केली आहे. या निवेदनावर डॉ. कुणाल खरात, नीलेश आंबेवाडीकर, निखिल आठवले, सचिन निकम, अॅड. अतुल कांबळे, योगेश म्हेत्रजकर, रामप्रसाद वाव्हळ, अरुण शिरसाठ यांच्या स्वाक्ष-या आहेत.
विद्यार्थ्यांची होतेय लूटमार...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:41 AM