खुलताबाद : राज्यभरात शाळांमधून ऑनलाइन अध्यापनाला सुरुवात झाली आहे. याशिवाय कोरोनाच्या परिस्थितीमुळे आॅनलाइन शिक्षणात विद्यार्थी मागे राहू नये, यासाठी सेतू अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांकडून जुनी पुस्तके जमा करून घेतली. अन् नवीन पुस्तकांचे वाटपच न केल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ लागले आहे. शिक्षकांबरोबर विद्यार्थ्यांनादेखील नवीन पाठ्यपुस्तकांची प्रतीक्षा लागून आहे.
शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार सुरुवातीच्या काळात विद्यार्थ्यांकडे असलेली गेल्या वर्षीची पुस्तके शाळेत जमा करण्यात आली. दरम्यान, विद्यार्थ्यांकडून पाठ्यपुस्तके परत घेऊ नये, अशी घोषणा शिक्षणमंत्र्यांनी केली. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून शाळेत जमा केलेली पाठ्यपुस्तके संबंधित वर्गातील विद्यार्थ्यांना परत मिळतील का, नवीन पाठ्यपुस्तके दिली जाणार आहे का, असे अनेक प्रश्न पालक-विद्यार्थ्यांकडून उपस्थित केले जात आहे.
खुलताबाद तालुक्यात जवळपास पंधरा ते वीस टक्के विद्यार्थ्यांनी जुनी पाठ्यपुस्तके शाळेत जमा केली. तेवढी संख्या वजा करून मुख्याध्यापकांनी चालू शैक्षणिक सत्रासाठी नवीन पाठ्यपुस्तकांची मागणी केली. ऑनलाइन शिक्षणासाठीदेखील पुस्तक महत्त्वाचे असून, जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके उपलब्ध होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यास किती पचनी पडेल हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सेतू वर्गातील अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके सहाय्यभूत ठरणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने त्वरित पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली पाहिजे, असे मत प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विजय साळकर यांनी व्यक्त केले.
----
शिक्षण विभाग जिल्हास्तरावरून तालुका स्तरावर व तेथून शाळेत व विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तके पोहोचविणार आहे. त्यामुळे शाळेतून नवीन पुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती पोहोचण्यासाठी आणखी किती दिवस वाट पाहावी लागणार आहे. यात शिक्षण विभागाने पुढाकार घेऊन प्राधान्याने कामे करावीत, असे मत जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सतीश कोळी यांनी व्यक्त केले.
-------------
पन्नास टक्के पाठ्यपुस्तके आली
सोमवारपर्यंत (दि.२६) सुमारे पन्नास टक्के पाठ्यपुस्तके गटशिक्षणाधिकारी कार्यालयास मिळाली आहेत. उर्वरित पुस्तके दोन तीन दिवसात मिळतील, अशी अपेक्षा आहे. जुनी पाठ्यपुस्तके २५ टक्के जमा झाली आहेत. सेतू अभ्यासक्रमासाठी तालुक्यातील शिक्षक गट पद्धतीने शाळेच्या आवारात किंवा गावातील खुल्या मैदानावर शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहेत. - सचिन सोळंकी, गटशिक्षणाधिकारी, पं.स., खुलताबाद