औरंगाबाद : विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर ६ रोजी दुपारी १२ वाजेपासून विद्यार्थी संघटनेने ठिय्या आंदोलनास सुरुवात केली. प्रशासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्याने विद्यार्थी कृती समितीने आंदोलन अधिक उग्र करीत गुरुवारपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. शुक्रवारी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी रिमझिम पाऊस सुरु असतानाही विद्यार्थ्यांचे उपोषण सुरूच आहे.
युजीसीने आदेश दिल्यानंतरही प्रशासनाने विद्यापीठ नियमित सुरू केलेले नाही, असे विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आहे. विद्यार्थी संघटनेने विद्यापीठ प्रशासनालाही निवेदन दिले. विद्यापीठ प्रशासनाने गुरुवारी आंदोलनकर्त्यांशी भेट घेतली. वसतिगृहे, ग्रंथालये सुरू करणे हे जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारित आहे. त्यामुळे जोपर्यंत त्यांचा निर्णय येणार नाही, तोपर्यंत ग्रंथालये व वसतिगृहे सुरू होणार नाहीत. तसेच जोपर्यंत महाराष्ट्र शासनाचे आदेश येणार नाहीत, तोपर्यंत तासिका सुरू होऊ शकत नाहीत, असे प्रशासनातर्फे आंदोलक विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.
जोपर्यंत आम्हाला लेखी काही देण्यात येत नाही आणि विद्यापीठ जोपर्यंत पूर्णवेळ सुरू होणार नाही, तोपर्यंत आम्ही सर्व बेमुदत उपोषण करणार आहोत, असे अमोल खरात, दीक्षा पवार, लोकेश कांबळे, श्रद्धा खरात, रामेश्वर पाटील, पांडुरंग भुतेकर यांनी सांगितले.