लातूर : शहरातील राजर्षी शाहू महाविद्यालयाची चेकलिस्ट सोमवारी जाहीर करण्यात आली असल्याने ती पाहण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांची गर्दी झाली होती़दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे़ त्यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे़ शैक्षणिक क्षेत्रात नावालेल्या लातुरातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची गेल्या आठवड्यापासून धावपळ सुरु झाली होती़ त्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे़ शहरातील राजर्षि शाहू महाविद्यालयात ५ हजार ३३० विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली असून त्यात आॅनलाईन अर्ज २८७ आहेत़ या महाविद्यालयाने सोमवारी सकाळी चेकलिस्ट जाहीर केली़ ही चेकलिस्ट पाहण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांनी महाविद्यालयात गर्दी केली होती़ चेकलिस्टमधील नाव, गुण यांची पडताळणी करण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरु होती़ चेकलिस्टनुसार त्रुटी दर्शविण्यात आलेली कागदपत्रे मिळविण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांची धावपळ सुरु आहे़ या महाविद्यालयाची पहिली प्रवेश यादी मंगळवारी जाहीर होणार आहे़ प्रवेशासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात येणार असून त्यानंतर गुरुवारी दुसरी प्रवेश यादी जाहीर करण्यात येणार आहे़ शहरातील अन्य महाविद्यालयांनी चेकलिस्ट अद्यापही जाहीर केली नाही़ (प्रतिनिधी)
‘शाहू’मध्ये चेकलिस्ट पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी
By admin | Published: June 24, 2014 12:39 AM