औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा प्रथम वर्ष वगळून २२ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. गणेश मंझा यांनी दिली.
कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेची तयारी सुरू आहे. यामध्ये बी.ए., बी.एस्सी. व बी.कॉम अभ्यासक्रमाची द्वितीय, तृतीय वर्षाची परीक्षा २२ नोव्हेंबरपासून सुरू होईल. प्रथम वर्ष व अन्य व्यावसायिक पदवी, अभ्यासक्रम, पदव्युत्तर अभ्यासक्रमांची परीक्षा डिसेंबरमध्ये होणार आहे. पदवी अभ्यासक्रमासाठी चार दिवसांत २८० परीक्षा केंद्र होणार आहेत, अशी माहितीही डॉ. मंझा यांनी दिली.
विद्यापीठाने २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक ७ जून रोजी जाहीर केले. त्यानुसार ९ जुलैपासून शैक्षणिक सत्रातील तासिका सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यावेळी ४ नोव्हेंबरपासून सत्र परीक्षा सुरू होतील, असे वेळापत्रक निश्चित केले होते, मात्र विद्यापीठ प्रशासनाने ३१ ऑक्टोबर रोजी महाविद्यालयांना सुधारित वेळापत्रक कळविले आहे. त्यानुसार २२ नोव्हेंबरपासून परीक्षा सुरू होतील.
३ लाख विद्यार्थी देणार परीक्षापरीक्षेसाठी विविध चार जिल्ह्यांतून ३ लाखांपेक्षा अधिक परीक्षार्थी विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षांचे वेळापत्रक, वर्णमालेनुसार बैठक व्यवस्था कशी असेल, यांसह परीक्षा केंद्रांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. सर्वाधिक ९७ परीक्षा केंद्र औरंगाबाद जिल्ह्यात असतील. ५१ परीक्षा केंद्र जालना जिल्ह्यात असून, बीड जिल्ह्यात ६२ परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात ३० परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली आहेत.