लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या पहिल्या दिवशी परीक्षार्थींना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले. हॉल तिकिटांवरील परीक्षा केंद्र ऐनवेळी बदलल्यामुळे विद्यार्थ्यांना कोठे जावे? नवीन परीक्षा केंद्र कोठे आहे? विद्यापीठाने दिलेल्या परीक्षा केंद्राचे नाव पहिल्यांदाच ते ऐकत असल्यामुळे विद्यार्थ्यांना धक्का बसत होता. परीक्षेला तर सुरुवात झाली असून, वेळेत कसे पोहोचायचे? केंद्रावर जाण्यासाठी आॅटोरिक्षा मिळेल का? अशा असंख्य नानाविध प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांना अश्रू आवरता आले नाहीत. अनेक ठिकाणी अपंग, अंध विद्यार्थ्यांनाही ढिसाळ नियोजनाचा फटका बसल्याची माहिती समोर आली आहे.विद्यापीठ पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षांना तब्बल ३ लाख ५ हजार ४९४ विद्यार्थी बसले आहेत. या सर्वांची परीक्षा शुक्रवारी सुरू झाली. या परीक्षेला सुरुवात होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना अभ्यासापेक्षा मोठ्या अग्निदिव्यातून जावे लागले.