औरंगाबाद : विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक परीक्षा व प्रोजेक्टचे गुण (अंतर्गत गुण) विद्यापीठाच्या (Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university) परीक्षा विभागाकडे विहित मुदतीत सादर न करणाऱ्या ६ महाविद्यालयांना प्रति विद्यार्थी २ हजार रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय मंगळवारी परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला़
डॉ़. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाची बैठक मंगळवारी झाली. सुरुवातीला १६ जानेवारी, १६ फेब्रुवारी आणि ५ जुलै रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त मान्य करण्यात आले. विद्यापीठातील विविध विभाग आणि संलग्नित महाविद्यालयांमध्ये समान अभ्यासक्रम आणि समान परीक्षा असाव्यात, या विद्या परिषदेच्या निर्णयावर चर्चा करण्यात आली. ऑनलाईन परीक्षेवर कोणाचेच नियंत्रण नसल्यामुळे जवळपास ८० विद्यार्थ्यांनी परीक्षा फार्म व शुल्क न भरताच त्यांनी पीआरएन क्रमांकावरून परीक्षा दिली. त्यामुळे परीक्षा विभागाने त्यांचे निकाल राखीव ठेवले आहेत. या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्याचा प्रस्ताव बैठकीत फेटाळण्यात आला. परिणामी, या विद्यार्थ्यांना आता दुसऱ्यांदा परीक्षा द्यावी लागणार आहे. बैठकीस कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. गणेश मंझा, अधिष्ठाता डॉ. वाल्मिक सरवदे, डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. भालचंद्र वायकर, डॉ. प्रशांत अमृतकर, डॉ. विणा हुंबे, प्राचार्य डॉ. सानप, डॉ. अर्जुने आदी उपस्थित होते.
संभाव्य वेळापत्रक जाहीरविद्यापीठाने यापूर्वी अकॅडमिक कॅलेंडर जाहीर केले होते. त्यानुसार ३० सप्टेंबरपर्यंत प्रवेशाची अंतिम मुदत होती; परंतु अनेक कारणांमुळे प्रवेश कालावधी वाढविण्यात आला. परिणामी, सन २०२१-२२ या या शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक कोलमडले. त्याचा परिणाम परीक्षेवर झाला. पुढील नियोजन आणखी बिघडू नये, यासाठी प्रथम सत्र परीक्षेचे वेळापत्रक सध्या तात्पुरत्या स्वरूपात ८ फेब्रुवारीपासून जाहीर करण्यात आले. मात्र, कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता परीक्षा ऑफलाइन की ऑनलाइन घ्यायच्या यावर पुढे ऐनवेळी निर्णय जाहीर केला जाईल, यावर निर्णय झाला.