बीड : शिस्त आणि नियमाचा धडा ज्या कार्यालयात बसून शिक्षणाधिकारी संपूर्ण जिल्ह्यातील शाळांना देतात त्याच कार्यालयात असलेल्या शाळेमध्ये मात्र विद्यार्थी नसतानाही दहा शिक्षकांना पोसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.आर. भारती यांनी बुधवारी केलेल्या पंचनाम्यात ही बाब समोर आली. बुधवारी सकाळी ११ वाजता भारती यांनी कन्या शाळेला भेट दिली. जि.प.च्या शिक्षण विभागाचा कारभार मागील सहा महिन्यांपासून याच शाळेच्या इमारतीतून चालतो. भारती शाळेत गेले तेंव्हा तेथे त्यांनी विद्यार्थ्यांच्या हजेरी रजिस्टरची मागणी केली. मात्र तेथील शिक्षकांनी हजेरी रजिस्टर उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे हजेरी रजिस्टर मागितले. हे रजिस्टर त्यांच्यापुढे ठेवले खरे मात्र त्याच्यावर कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्याच नव्हत्या.जून महिन्यापासून या शाळेमध्ये एकही विद्यार्थी उपस्थित नाही. असे असतानाही कर्मचाऱ्यांचे वेतन अदा केले कसे ? असा प्रश्न भारती यांनी उपस्थित केला आहे. विद्यार्थीच नाही तर अध्यापनाचे काम शिक्षकांनी केले कसे ? असा सवालही आता उपस्थित झाला आहे. शाळेमध्ये एकही शिक्षक नसल्याचे आढळून आल्यावर भारती यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी तडक आपले कार्यालय गाठून शिक्षणाधिकारी व्ही.डी. कुलकर्णी यांना नोटीस बजावत खुलासा मागितला आहे. येत्या दोन दिवसात खुलासा सादर करावा अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा टोकाचा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान, नियमबाह्य बदल्या, वस्ती शाळा शिक्षकांचे बनावट आदेश, दर्जावाढ मध्ये झालेली अनियमितता, बेकायदेशीर पदोन्नत्या या कारणांमुळे आधीच चौकशीचा ससेमिरा शिक्षण विभागाच्या मागे लागलेला असताना आता त्यात आणखी एक भर पडली आहे. त्यामुळे कुलकर्णी चांगलेच गोत्यात आले आहेत. कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)बुधवारी सकाळी ११ वाजता सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.आर. भारती हे शिक्षण विभागाला लागून असलेल्या जि.प.च्या कन्या माध्यमिक शाळेत धडकले.४त्यांना तेथे एकही विद्यार्थी आढळून आला नाही.४विद्यार्थी नसताना रेकॉर्डला मात्र १० शिक्षक कार्यरत असल्याचे निदर्शनास आले.४त्यांनी उपस्थिती रजिस्टर मागविले.मात्र बहुतांश शिक्षकांच्या स्वाक्षऱ्या नव्हत्या.४कन्या शाळेच्या परिसरातच शिक्षण विभागाचे कार्यालय आहे. मात्र शिक्षणाधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष कसे? असा सवाल भारती यांना पडला.४त्यांनी शिक्षणाधिकारी (प्रा.) व्ही.डी. कुलकर्णी यांना नोटीस बजावत दोन दिवसात खुलासा सादर करा, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.शिक्षणाधिकारी व्ही.डी. कुलकर्णी यांच्या दालनाला चिकटूनच कन्या शाळा आहे. येथे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून विद्यार्थी नाहीत. तरीही दहा शिक्षकांचा पगार प्रत्येक महिन्याला न चुकता होतो. विद्यार्थीच नाहीत तर शिक्षक कोणाला शिकवतात? असा सवाल उपस्थित झाला आहे. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन न करता त्यांना फुकटचा पगार देणाऱ्या कुलकर्णी यांना त्यांच्या वेतनातून या पगाराची रक्कम का कपात करण्यात येऊ नये, अशी विचारणा उपमुख्य कार्यकारी अधिकारी भारती यांनी केली आहे. कुलकर्णी यांनी झोपेचे सोंग घेत या शिक्षकांना अभय देण्याचे कारण काय? हे मात्र गुलदस्त्यात आहे. याबाबत कुलकर्णी यांच्याशी संपर्क केला असता ते ‘आऊट आॅफ कव्हरेज’ होते.
विद्यार्थ्यांची पाठ; पगार बिनबोभाट
By admin | Published: November 14, 2014 12:27 AM