विषय शिक्षकांचे गणित बिघडले : समायोजनाअभावी १०७ पदे रिक्त अन् ८१ विषय शिक्षक अतिरिक्त
योगेश पायघन
औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षकांची १०७ पदे रिक्त आहेत, तर ८१ शिक्षकांचे समायोजन जाणीवपूर्वक रखडवले जात आहे. शहरालगतच्या शाळांत अतिरिक्त शिक्षकांचा भरणा आहे, तर एकाच विषयाचे अनेक शिक्षक एकाच शाळेवर उपलब्ध असताना, ग्रामीण भागातील येणे-जाणे सोयीचे नसलेल्या गावांतील प्रशालांत विषयनिहाय शिक्षकांचा असमतोल विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांंसाठी शिक्षक की शिक्षकांच्या सोयीसाठी शाळा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात २०१२ पासून शिक्षक अतिरिक्त आहेत. आठवीचा वर्ग अगोदर माध्यमिकमध्ये होता. नंतर आठवीचा वर्ग प्राथमिकला जोडला गेला. त्यामुळे ते शिक्षक अतिरिक्त ठरले. त्यांच्या समायोजनासाठी तत्कालीन सीईओ पवनित काैर आणि तत्कालीन शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांनी शिक्षण सचिव आणि आयुक्तांना भेटून, वारंवार पाठपुरावा करून विद्यार्थी संख्येनुसार ५० पदे मंजूर करून घेतली. त्या पदांनुसार समायोजन प्रक्रिया शक्य आहे. २-३ वेळा ८१ अतिरिक्त शिक्षकांची समायोजन प्रक्रिया राबविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, काही उपद्व्यापी शिक्षकांना सोयीच्या ठिकाणाहून हलविले जाऊ नयेत, यासाठी आता समायोजन नको आहे. याच शिक्षक संघटनांनी यापूर्वी, समायोजन करा, नाही तर आंदोलन छेडू, असा दोन-तीन वेळा इशारा दिला होता. मात्र, आता पुन्हा संघटनांचा दबाव, राजकीय लोकप्रतिनिधींचा दबाव, न्यायालयात याचिका अशा प्रकारे अडथळे आणल्याने, समायोजन होऊ नये, यासाठी प्रयत्न होत आहेत.
---
विद्यार्थ्यांचे नुकसान
- जिल्ह्यात १९ शाळांना इंग्रजी शिक्षक नसताना वाकला येथील शाळेत ५ पैकी ३ शिक्षक इंग्रजीचे आहेत. विहामांडवा, अंधारी, पानवडोद, तुर्काबाद, गणोरी, भिवधानोरा, शिवूर परसोडा, मनु, चापानेर, बनोटी, बोरगाव, बाजारसावंगी येथे इंग्रजी शिक्षक नाहीत. पण, १४ इंग्रजी शिक्षक अतिरिक्त आहेत.
- रांजणगाव येथे ९ पैकी ४ कार्यरत शिक्षक विज्ञानाचे आहेत, तर बोरगाव, नाचनवेल, वासडी, चिंचोली, मनुर, गंगापूर, उंडणगाव, शिऊर येथे विज्ञान शिक्षक नाही.
- ढोरकीन, अजिंठा, शिवना, वैजापूर, वाकला, शिऊर, खंडाळा, बोरसर, मनूर, चापानेर, नाचनवेल, टाकळी, लाडसावंगी, भिवधानोरा शाळांत गणिताचे शिक्षक नसताना, १४ गणिताचे शिक्षक अतिरिक्त आहेत, तर कन्नडला एकाच शाळेत ३ गणित शिक्षक आहेत.
---
उर्दूसह मराठी, हिंदीची स्थिती बिकट
--
ढोरकीन, कसाबखेड्यात उर्दूचे वर्ग आणि विद्यार्थी आहेत, पण शिक्षक नाहीत, तर काही ठिकाणी २ - २ अतिरिक्त शिक्षक आहेत. मनूर येथे सर्वच शिक्षक सामाजिक शास्त्रे विषयाचे, तर फुलंब्रीत ११ मंजूर पदांमध्ये ७ शिक्षक भाषा विषयाचे आहेत. जिल्ह्यात २४ सामाजिक शास्त्राचे शिक्षक अतिरिक्त असताना, १४ प्रशालांत या विषयाची पदे रिक्त आहेत. मराठी, हिंदीचे १६ शिक्षक अतिरिक्त असताना २६ ठिकाणी जागा रिक्त आहेत.
----
विषय - अतिरिक्त - रिक्त
विज्ञान - ८ - २६
गणित - १४ - १६
इंग्रजी - १४ - १९
भाषा - १६ - २६
सामाजशास्त्र - २४ - १४
उर्दू माध्यम - ५ - ६
एकूण - ८१ - १०७
----
संस्था समायोजित शिक्षकाला घेत नाहीत
विद्यार्थ्यांसाठी शिक्षक आहेत, फक्त शिक्षकांच्या सोयीसाठी नोकऱ्या नाहीत. विद्यार्थीहित पाहण्याची गरज शिक्षकांतून व्यक्त होत आहे. बऱ्याचशा शाळेत एकाच शाळेत चार चार गणिताचे शिक्षक आहेत, तर ग्रामीण भागात ८ ते १० शाळांत वर्षानुवर्षे गणिताचे शिक्षक नाहीत. हा त्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. तसेच माध्यमिक विभागातही अतिरिक्त राहिलेल्या शिक्षकांना ज्या शाळांत समायोजन केले, त्या शाळा, संस्थांत हजर करून घेत नाहीत. त्यांना त्यांच्या मर्जीनुसार नवीन नियुक्ती करून घ्यायची तेअस. त्यामुळे तेथून शिक्षक परत येतात. त्यामुळे २०-२१ माध्यमिक शिक्षक अतिरिक्त राहिले असल्याचे शिक्षणाधिकारी डाॅ. बी. बी. चव्हाण यांनी सांगितले.
---
शहरालगत अतिरिक्त शिक्षक, ग्रामीणवर अन्याय
मी सेवेत असताना ३ वेळा समायोजनाच्या तारखा घेतल्या. २९ जूनला कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र, विरोध झाला, न्यायालयात याचिका दाखल झाल्या. विद्यार्थी हिताच्यादृष्टीने समायोजन क्रमप्राप्त आहे. शिक्षकांची सोय पाहण्यापेक्षा अनेक पंचायत समितीच्या लेखापरीक्षणात मान्य पदांपेक्षा जास्त पदे कार्यरत असल्याच्या आक्षेपांचे अतिरिक्त शिक्षक काढून शिक्षकांचे समायोजनाने अनुपालन करावे लागणार आहे.
- सूरजप्रसाद जयस्वाल, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी (प्राथमिक), औरंगाबाद
---
शाळांना विषय शिक्षक मिळावेत
जिल्हा परिषद प्रशालांवर विश्वास ठेवून पालकांनी विद्यार्थी शाळेत पाठविले. विद्यार्थी संख्या वाढली आहे. मात्र, शिक्षकांची उपलब्धता शैक्षणिक वर्ष आणि प्रत्यक्ष वर्ग सुरू झाल्यानंतरही झालेली नाही. समायोजन न झाल्याने आमच्या बदल्याही प्रलंबित आहेत. विदयार्थीहित, प्रशालांची गुणवत्ता आणि जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांची थांबलेली बदली प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यासाठी तात्काळ समायोजन होणे गरजेचे आहे.
- अनिल देशमुख, जिल्हाध्यक्ष,
माध्यमिक शिक्षक भारती, औरंगाबाद.