छत्रपती संभाजीनगर : कोरोनाच्या महासंकटामध्ये विद्यार्थ्यांकडून लेखणीचा सरावच बंद पडला होता. त्याचा परिणाम दहावी, बारावीच्या परीक्षांवर झाल्याचे माध्यमिकचे शिक्षणाधिकारी मधुकर देशमुख यांच्या निदर्शनास आले. तेव्हा त्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यासाठी सराव परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्यास यश मिळाल्यानंतर हा प्रकल्प मराठवाड्यात राबविण्याचा निर्णय शिक्षण उपसंचालकांनी घेतला आहे. त्यानुसार आता दहावीच्या विद्यार्थ्यांच्याही सराव समृद्धी चाचणी घेण्यात येणार आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी माध्यमिक शिक्षण विभागाने राबविलेल्या सराव चाचणी परीक्षा उपक्रम संपूर्ण मराठवाड्यात राबविण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर आता हा उपक्रम दहावीच्या विद्यार्थ्यांमध्येही राबविण्यात येणार आहे. त्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागासोबत उपसंचालक कार्यालयानेही त्यात पुढाकार घेतला आहे. त्यासाठी नुकतीच मुख्याध्यापकांची एक दिवसाची कार्यशाळा स्टेपिंग स्टोन्स हायस्कूलमध्ये घेण्यात आली. त्या कार्यशाळेला शिक्षण उपसंचालक अनिल साबळे, सहायक संचालक रविंद्र वाणी, शिक्षणाधिकारी मधुकर देशमुख यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.
जिल्ह्यातील जवळपास ८५० शाळांमधील ७० ते ७२ हजार विद्यार्थी सराव समृद्धी परीक्षा देणार आहेत. सप्टेंबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या शेवटी तीन दिवस ही परीक्षा घेण्याचे नियोजन आहे. त्यात राज्य मंडळाशी संलग्नित सर्व अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित उच्च माध्यमिक शाळांनी सहभागी होणे अनिवार्य केले आहे. या परीक्षेसाठी परीक्षा समिती, प्रश्नपत्रिका निर्मिती समिती गठीत केली आहे. शिक्षक, मुख्याध्यापकांनी सराव चाचणी परीक्षा पार पडल्यानंतर लगेच पेपर तपासून मुलांना मार्क्स सांगावेत, म्हणजे मुलांना आवश्यक सुधारणा करणे सोपे जाईल, असेही शिक्षणाधिकारी देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
कॉपीमुक्तीसाठीचे प्रयत्नदहावीच्या विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्य प्रभावी झाले पाहिजे. त्यातुन परीक्षा कॉपीमुक्त होण्याच्या उद्देशानेच सराव समृद्धी अंतर्गत तीन चाचणी व एक सराव परीक्षेचे नियोजन कले आहे. शाळांनी वेळापत्रकानुसार सराव चचाणी घ्यायची आहे. परीक्षेस उपस्थित, अनुपस्थित विद्यार्थ्यांची यादीही तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत.- मधुकर देशमुख, माध्यमिक शिक्षणाधिकारी