- किलबिलाटाने गजबजल्या शाळा
- रांगोळ्या, गुलाबाच्या फुलांनी सजल्या शाळा, गावकऱ्यांकडून शिक्षक, विद्यार्थ्यांचे स्वागत
--
औरंगाबाद : शाळा भरण्याची वाजलेली घंटा, सजलेल्या शाळा, रांगोळ्या, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, शिक्षकांत उत्सुकता तर गावकऱ्यांकडून शाळा सुरू करण्यासाठी उत्स्फूर्त मदतीचे चित्र गुरुवारी जिल्ह्यात पाहायला मिळाले. जिल्ह्यातील ६२० शाळांत आठवी ते बारावीचे वर्ग भरले. शाळा, फळा, खडूच्या सहवासात विद्यार्थ्यांनी मंतरलेल्या दिवसाची अनुभूती घेतली.
गेल्या दीड वर्षात काही दिवसांचा अपवाद वगळता ऑनलाइन शिक्षणाला कंटाळलेले विद्यार्थी, शिक्षक एकत्र आल्याने एक अभूतपूर्व उत्साह, किलबिलाटाने शाळा गजबजल्या होत्या. महिनाभरापासून कोरोनामुक्त गावांतील शाळा सरपंचांच्या अध्यक्षतेखालील सात सदस्यीय समितीचा शाळा सुरू करण्याचा ठराव, पालकांची लेखी संमती, शाळांकडून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी करून शाळा सुरू करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. त्यासाठी मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांच्यासह शिक्षणाधिकारी डाॅ. बी. बी. चव्हाण यांनी सरपंच, मुख्याध्यापकांशी संवाद साधला होता. त्यानुसार तयारी करून गुरुवारी महिनाभरापासून कोरोनामुक्त असलेल्या गावांतील शाळांत वर्ग भरले.
जिल्ह्यातील १,३६९ पैकी १४९ गावे कोरोनाच्या दोन्ही लाटांतही आजपर्यंत कोरोनामुक्त असून, नऊ तालुक्यांतील बाधित झालेल्या गावांपैकी ९०१ गावांत सध्या एकही कोरोनाचा रुग्ण नाही. जिल्ह्यात ५९५ गावांत ८५२ शाळांत आठवी ते बारावीचे वर्ग आहेत. त्यातही महिनाभरापासून केवळ ४४६ गावे कोरोनामुक्त आहेत. त्यातील ६२० शाळा गुरुवारी सुरू झाल्या. तीस दिवस पूर्ण झाल्यावर आणखी काही गावांच्या शाळांतील वर्ग सुरू होतील, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. तर कोरोना रुग्ण आढळल्यावर शाळा बंदही करण्यात येतील, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मुख्याध्यापक, शिक्षकांतूनही शाळा सुरू करण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. सकाळी शाळेत प्रवेशावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुलाबाची फुले दिली तर काही ठिकाणी गावकऱ्यांनीही विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे स्वागत केले. त्यानंतर सॅनिटायझरचा फवारा, मास्क वापरण्याच्या सूचना देत पालकांची संमतिपत्रे घेऊन विद्यार्थी फळा, खडू, शिक्षकांच्या सान्निध्यात वर्गात बसले. दरम्यान, शिक्षण विभागाकडून शिक्षणाधिकारी डाॅ. चव्हाण यांनी देवगाव व लासुर स्टेशन येथील शाळांना भेटी दिल्या. तर उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुखांनीही शाळांना भेटी देत गावकऱ्यांचा प्रतिसाद, शिक्षकांची तयारी आणि विद्यार्थ्यांचा उत्साह जाणून घेतला.
---
पालक, गावकरीही उत्साही; पण मान्यतेची अडचण
---
गंगापूर तालुक्यातील गणेशपूर येथे पाचवी ते आठवीचे वर्ग गावकऱ्यांच्या सहमतीने सुरू करण्यात आले आहेत. यासह खुलताबाद आणि इतर तालुक्यांतूनही कोरोनामुक्त गावांतील प्राथमिक शाळा सुरू करण्याची मागणी होत आहे. मात्र, पहिली ते सातवीच्या शाळा सुरू करण्याची शासनाची मान्यता नाही. त्यामुळे पालक, शिक्षक, गावकऱ्यांची सहमती असतानाही तिथे शाळा सुरू करायला अडचण असल्याचे डाॅ. चव्हाण म्हणाले.