--
औरंगाबाद : शैक्षणिक सत्र सुरू होऊन तीन आठवडे सरले. जिल्ह्यात ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात झाली. मात्र, अद्याप पहिली ते आठवीच्या बहुतांश विद्यार्थ्यांना नव्या पाठ्यपुस्तकांचे संच वाटप झाले नसल्याने पुस्तकांशिवाय विद्यार्थ्यांचे ज्ञानार्जन सध्या सुरू आहे. नव्या पुस्तकांचे संच जुलै महिनाअखेर पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तक मिळण्याला ऑगस्ट महिना उजाडणार आहे.
गेल्या वर्षी पहिली ते आठवीच्या तीन लाख ३३ हजार विद्यार्थ्यांना समग्र शिक्षण अभियानातून पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले होते. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना पुनर्वापरासाठी पुस्तके परत करण्याचे आवाहन केले. त्यानुसार जिल्ह्यातून १४ हजार १९ पालकांनी पुस्तके परत केली आहेत. कोरोनामुळे प्राथमिक विभागाच्या शाळा वर्षभर उघडल्याच नाही, तर पाचवी ते आठवीच्या शाळा काही काळ उघडल्याने प्रत्यक्ष वर्ग भरले. त्यामुळे पुस्तकांचा फारसा वापर झाला नसल्याने ती सुस्थितीत आहेत. शाळा स्तरावर पुस्तकांच्या पुनर्वापरासाठी केलेल्या विनंतीला पालकांनी चांगला प्रतिसाद दिला, तर काही पुस्तकांचे संच शिक्षण विभागाकडे शिल्लक आहेत. त्यानुसार या वर्षीच्या पटावरील विद्यार्थी संख्येनुसार मागणी समग्र शिक्षा अभियानाकडून नोंदविली गेली. मुंबईहुन त्या मागणीची ऑनलाइन पडताळणी होऊन निश्चिती केली जाणार आहे. त्यानंतर मागणीनुसार पुस्तकांचा पुरवठा बालभारतीकडून केला जाणार असल्याचे स्वजल जैन यांनी सांगितले.
---
ब्रिज कोर्सच्या फलनिष्पत्तीवर प्रश्नचिन्ह
--
मागील वर्षी तांत्रिक अडचणीमुळे ३० टक्के विद्यार्थ्यांपर्यंतही ऑनलाईन शिक्षण पोहोचले नाही. याही वर्षी त्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. अभ्यासात मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी क्षमता विकास एनसीईआरटीचा ४५ दिवसांचा ब्रीज कोर्स सुरू झाला. मात्र, या अभ्यासक्रमाच्या पीडीएफ प्रिंटचा भुर्दंडही आहेच. शिवाय त्याच्या फलनिष्पत्तीवर शिक्षक, मुख्याध्यापकांकडून शंका उपस्थित केली जात आहे.
----
पुस्तकांची छपाई युद्धपातळीवर सुरू
--
बालभारतीकडून पुस्तकांची छपाई युद्धपातळीवर सुरू आहे. महिनाअखेरपर्यंत त्यांच्याकडून पुस्तकांचे संच उपलब्ध झाल्यावर त्याचे विद्यार्थ्यांना वाटप होईल. शाळांकडील शिल्लक पुस्तके, पुनर्वापरात आणलेली पुस्तके वजा करून पटावरील विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार मागणी केलेली आहे. मागणीचा आकडा अंतिम होणे अद्याप बाकी आहे.
-डाॅ. बी. बी. चव्हाण, शिक्षणाधिकारी
-----